राजदला आणखी एक धक्का


राजद नेते लालूप्रसाद यादव यांनी भाजपा भगाओ आणि देश बचाव हा मेळावा भरवला आणि आपल्या मागे किती लोक आहेत याचे प्रदर्शन घडवले पण त्याच रात्री त्यांना धक्का देणारी घटना घडली. लालूंच्या पत्नी राबडीदेवी आणि पुत्र तेजप्रकाश या दोघांना आयकर खात्याची झडती साठीची नोटीस मिळाली. हा धक्का कमी म्हणून की काय पण दुसर्‍या दिवशी आणखी एक धक्का बसला. या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लालू प्रसाद यादव यांचे अगदी निकटवर्ती सहकारी माजी खासदार शहाबुद्दीन यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. सिवाम येथील दोघा बंधूंना ऍसिडने न्हाऊ घालून त्यांना जाळून मारल्याच्या प्रकरणात ही शिक्षा खालच्या कोर्टाने सुनावली होती. तिला उच्च न्यायालयात काही दिलासा मिळेल असे वाटले होते पण उच्च न्यायालयाने हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ असल्याचे सत्र न्यायालयाचे म्हणणे मान्य केले.

शहाबुद्दीन याने न्यायालयात गयावया करून शिक्षा कमी करण्याची मागणी केली होती पण ती न्यायालयाने फेटाळली. शहाबुद्दीन याला जन्मठेपेची शिक्षा होईल एवढे त्याने ४० जघन्य अपराध केले आहेत. त्यातल्या १२ प्रकणात त्याच्यावर खटले दाखल आहेत आणि २८ खटल्यात त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झालेले नाहीत. बिहारमध्ये लालूंच्या पाठिंब्यावर नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले तेव्हा शहाबुद्दीन एका खटल्यात जामिनावर सुटला. ही सुटका होताच त्याने नितीशकुमार यांना डिवचले. त्यामुळे नितीशकुमार यांनी त्याचा जामीन रद्द करण्याची व्यवस्था केली आणि त्याला पुन्हा आत घातले. तो ११ वर्षांपासून तुरूंगात होता पण त्याचा कारावास क्षणाच्या सुटकेनंतर पुन्हा सुरू झाला.

नितीशकुमार यांचे सरकार लालूंच्या पाठींब्यावर अवलंबून होते पण त्याचा उल्लेख खुद्द लालूंनी कधी केला नव्हता. ते आडून आडून तसे सूचित करीत असत पण शहाबुद्दीन याने जामिनावर सुटताच तसे थेट सांगून टाकले आणि नितीशकुमार हे सोयीचे मुख्यमंत्री आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे असे सुुनावले. त्याच क्षणी नितीशकुमार आणि लालू यांच्यातली पहिली ठिणगी पडली आणि महागठबंधनाच्या गाठी सैल होण्यास सुरूवात झाली. म्हणजे एका परीने महागठबंधन मोडण्यासाठीची शेवटची काडी शहाबुद्दीननेच टाकली. आता तो जन्मठेपेवर जाईल पण दरम्यान अन्य अनेक खटले जारी असल्यामुळे एका ना एका खटल्यात त्याची कोठडी जारी राहील आणि त्याचा मुक्काम आता आतच राहणार आहे.

Leave a Comment