स्व-विकासाच्या धोरणाची अंमलबजावणी

प्रगती साधायची असेल तर त्यासाठी स्वतःचे ज्ञान वाढवण्याला पर्याय नाही! असे ज्ञान वाढवत राहणे म्हणजेच तर स्व-विकास साधणे. ज्ञान वाढविण्यासाठी आपल्याकडे कोणते ज्ञान आहे याचा वस्तुनिष्ठ विचार करणेही तितकेच आवश्यक आहे. स्वतःबद्दलची पुढील वस्तुनिष्ठ माहिती असणे प्रत्येकाला गरजेचे आहे : 

  •  स्व-मुल्यांकन : सर्वप्रथम स्वतःकडे सध्या असलेली कौशल्ये, ज्ञान, क्षमता आणि हेतु ओळ्खा.
  •  उद्दिष्टे : उद्दिष्टे निश्चित करण्यामुळे कोणती नविन कौशल्ये, ज्ञान आणि अनुभव मिळवायला हवेत ते ठरविता येते. शिवाय ही उद्दिष्टे तुमच्या व्यक्तिगत व करीयरमधील हेतुंशी आणि तुमच्या संघटनाच्या (संस्थेच्या) उद्दिष्टांशी, दुरदृष्टीशी मिळतीजुळती आहेत का याचेही भान येते. 
  •  अध्ययनाचा हेतु : सद्यस्थिती आणि तुम्हाला हवा असलेला परिणाम यातील फरक ओळ्खा. यामुळे तुम्हाला कोणत्या विशिष्ट बाबींचे ज्ञान मिळवले पाहिजे, कोणती नविन कौशल्ये, क्षमता विकसित केल्या पाहिजेत याचा स्पष्ट आराखडा तुमच्या नजरेसमोर उभा राहील.
  •  उद्दिष्टातील बदल (सुधारणा) : तुम्ही ठरविलेली उद्दिष्टे म्हणजे फक्त एक योजना आहे, दृढ वचन नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे परिस्थितीनुरूप त्यात बदल किंवा सुधारणा करणे यात काही गैर नसुन ते अनिवार्य आहे.

आता, उद्दिष्टांची साधारण रूपरेषा ठरविल्यावर यातील प्रत्येक उद्दिष्टासाठी काही पथ्येही पाळली पाहिजेत. काय आहेत ही पथ्ये?

  • तारीख नक्की करा : स्व-विकासाची योजना ही खरे तर निरंतन चालणारी प्रक्रिया आहे; पण तरीही या योजनेच्या पूर्ततेसाठी एखादी अदमासी तारीख नक्की करा.
  • अध्ययनाची रणनीती : आवश्यक ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही काय योजना आखणार आणि उद्दिष्टे पुर्ण करण्यासाठी कोणत्या प्रक्रियेचा अवलंब करणार हे मनाशी पक्के करा. ज्ञानप्राप्तीच्या या रणनीतीत या बाबींचा समावेश असावा : वाचन, अभ्यास, योग्य लोकांच्या मुलाखती आणि त्यांच्याशी केलेल्या चर्चा, संपर्क, इंटरनेटवरून संपर्क, साहित्यपरीक्षणे, लिखाण आणि तुम्ही घेतलेल्या अनुभवांचे सखोल चिंतन.
  •  अध्ययनाची साधने : स्व-विकासासाठी ज्ञान वाढवायचे, तर त्यासाठी अध्ययनाची उचित साधने जमविणे ओघाने आलेच. या साधनांमध्ये यांचा समावेश असावा : विषयांशी संबंधीत साहित्य, योग्य गुरु, सहकारी, इतर व्यावसायीकांचे जाळे, विक्रेते किंवा पुरवठादार, कार्यशाळा, तांत्रिक संमेलने, व्यावसायीक संघटनांमधील समावेश, उपकरणांच्या माहितीपुस्तिका, प्रयोगशाळांमधील परीक्षणे, तुमचे पर्यवेक्षक (सुपरवायझर), उत्पादन प्रक्रियेत भाग घेणारे कामगार, कार्यक्षेत्राचा अनुभव, संगणक, इंटरनेट इ.
  • अध्ययनाचे पुरावे : तुम्ही तुमची उद्दिष्टे गाठल्याचे सिद्ध करणारे कोणते पुरावे तुम्ही विकसित करणार आहात त्यांची यादी बनवा. तुम्हाला मिळालेले ज्ञान सत्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी तुमच्या अभ्यासाचे जर्नल किंवा टिपणे, साहित्य-परीक्षणे, ग्रंथसुची, लेखी किंवा तोंडी अहवाल, प्रश्नावली संग्रहित करा.  
  •  योजनेचे मुल्यांकन : अध्ययनयोजनेतुन तुम्ही यशस्वीपणे मिळवलेल्या ज्ञानाचे मुल्यांकन करण्यासाठी कोणती पद्धत वापरणार ते सविस्तरपणे लिहुन काढा. म्हणजेच तुमची ज्ञानप्रक्रिया योग्य दिशेने चालली आहे का हे पडताळण्यासाठी तुम्ही कोणते निकष व मार्ग चोखाळणार हे निश्चीत करा. 
  •  प्रतिक्रिया आणि उजळणी : स्व-विकासाची योजना कागदावर आखुन पुर्ण झाल्यावर तिची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यापुर्वी तुमच्या गुरूंशी, सल्लागारांशी विचारविमर्श करा. त्यांच्या प्रतिक्रिया जाणुन घ्या. तुमचे ज्ञान फक्त तुमच्या व्यक्तिगत गरजांवरच आधारित नसल्याची खात्री यामुळे पटेल. शिवाय तुमचे कार्यालयीन सहकारी, कुटुंबिय व मित्रमंडळी यांचीही तुमच्या योजनेबद्दलची मते विचारात घ्या.
  • मिळवलेल्या परिणामांचा सारांश : तुम्ही आखलेल्या योजनेतील प्रकल्प पुर्ण केल्यानंतर, यातुन मिळालेल्या यशाचे मुल्यमापन होणेही तितकेच गरजेचे आहे. यासाठी पुढील प्रश्नांची उत्तरे मिळवा : तुम्ही कोणती सूक्ष्म दृष्टी (सखोल ज्ञान) प्राप्त केलेत? कोणती नवीन माहिती मिळवलीत? कोणती नवी कौशल्ये, क्षमता विकसित केल्यात? कोणते नवे अनुभव गाठिशी बांधलेत आणि त्यातुन काय शिकलात? या संपुर्ण प्रक्रियेविषयी तुमच्या एकंदरीत भावना काय आहेत? या प्रश्नांच्या उत्तरातुन तुम्ही आखलेल्या योजनेचा मतितार्थ तुमच्या लक्षात येईल.
  •  पुढचा टप्पा : तुम्ही आखलेल्या योजनांमधुन मिळवलेल्या यशाविषयी योग्य गुरूंशी, कुटुंबियांशी, मित्रांशी मुक्त चर्चा करून त्यांची मते जाणुन घ्या.

लक्षात ठेवा, तुम्हाला याच ठिकाणी थांबायचे नसुन इथुनही पुढे जायचे आहे. तेव्हा या निरंतन चालणाऱ्या प्रक्रियेसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा!            

 

Leave a Comment