भारतातील कांही हटके गांवे


भारत खरा पहायचा असेल, अनुभवायचा असेल तर गावकसब्यातून पाहायला हवा. म्हणजे खेडोपाडी हिंडून तो अनुभवायला हवा. २०११ च्या जनगणनेनुसार आजही आपल्या लोकसंख्येच्या सुमारे ६९ टक्के जनता खेड्यात राहते. भारतात आज नोंदली गेलेली ६ लाख ४० हजार खेडी आहेत. त्यातील २ लाख ३६ हजार गावांची लोकसंख्या ५०० पेक्षा कमी आहे. तर ४००० खेड्यांची लोकसंख्या १० हजारापर्यंत आहे. भारतातील बहुसंख्य गावांची स्वतःची अशी खास वैशिष्ठ्ये आहेत. अशीच कांही हटके गांवे अशी


झारखंड राज्यातील रांची पासून ६५ किमीवर असलेले मॅक्लुस्कीगंज गांव मिनी लंडन म्हणून ओळखले जाते. ३६५ बंगले असलेल्या या गावात पूर्वी अँग्लो इंडियन समुदायाचे लोक रहात असत. घनदाट जंगलात आदिवासी पाड्यांच्या सोबत हे गाव वसले आहे.


उत्तरप्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील माधवपट्टी गाव आणखीच वेगळे. केवळ तेथील रहिवाशांनाही नाही तर सर्व भारतीय जनतेला अभिमान वाटावा असे. चार हजारांची लोकसंख्या असलेल्या या गावातून ४७ आयएसएस देशाला मिळाले आहेत. उत्तरप्रदेशातील अमरोहा सलारपूर हेही असेच ३५०० लोकसंख्येचे गांव. मात्र येथील शेतकरी अवघ्या पाच महिन्यात ६० कोटी रूपयांचे उत्पन्न टोमॅटो विकून मिळवितात. या गावात १२०० हेक्टर क्षेत्रावर टोमॅटो लागवड केली जाते.

हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील बिसान गावात प्रत्येक घरातील किमान १ जण तरी भारतीय लष्करात दाखल झालेला आहे. आज घडीला या गावातील ५५० जण सैन्यात आहेत तर ३५० माजी सैनिक आहेत. आपले माजी लष्करप्रमुख दलबिरसिंग सुहाग याच गावचे आहेत. सहसरा जिल्यातील बनगाव या गावाची लोकसंख्या आहे ७० हजार. मात्र येथील हिंदू आणि मुस्लीम स्वतःच्या नावापुढे खाँ आडनाव लावतात.


महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ हे गांव कोब्रा नागांचे गाव म्हणून ओळखले जाते.येथे हजारोंच्या संख्येने अतिविषारी समजले जाणारे कोब्रा नाग सापडतात.प्रत्येक घरातून या नागांना विश्रांती घेण्यासाठी कांही जागा सोडली गेली आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत या गावात एकही मृत्यू सर्पदंशामुळे झालेला नाही. तेलंगणातील पेट्टाकुंटा थाडा हे गांव विधवांचे गांव म्हणून ओळखले जाते. हायवेच्या जवळ असलेल्या या गावातील ८० पुरूषांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथे पाहावे तेथे विधवा स्त्रिया दिसतात. हा ईश्वराचा शाप असल्याची येथील लोकांची भावना आहे.

Leave a Comment