बेबी बूम आणि सप्टेंबर महिन्याचे कोडे

कोणत्याही घरात मुलगी, सून गरोदर राहिली की  मुलगा होणार की मुलगी याची जशी उत्सुकता असते तसे बाळाचा जन्म नक्की कधी होणार याचीही आकडेमोड सुरू होते. मग त्या वेळात घरात कोणाकोणाचे वाढदिवस असतात याचाही आढावा घेतला जातो. पण तुमच्या हे कधी लक्षात आले आहे का की एकंदरीत सप्टेंबर महिना हा अन्य कोणत्याही महिन्यापेक्षा बेबीबूमचा महिना असतो.

मग आता शोधा बरे आपल्या घरातील एकूण माणसांपैकी सप्टेंबरमध्ये वाढदिवस असलेले लोक किती आहेत ते! मजेचा भाग सोडला तर यामागेही कांही कारणे आहेत आणि ती थोडी मजेशीरपण आहेत.

सर्वसाधारणपणे असे आढळते की उष्ण कटिबंधात प्र्रत्येक महिन्यात होणार्‍या जन्मांच्या सरासरीत ऑगस्ट महिन्यात दीडपट तर सप्टेंबरमध्ये हेच जन्मप्रमाण जवळजवळ दुप्पट असते. खरे वाटत नसेल तर कोणत्याही शहरातील, गावांतील जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयाकडे चौकशी करून पहा. अगदी प्रसूतीगृहांकडे या संबंधीची चौकशी केलीत तरी तेथेही सप्टेंबर महिना जरा जादाच गर्दीचा असतो असे दिसून येते.

मग काय असावे बरे या सप्टेंबरमधील जादा जन्मांचे कोडे?
वैद्य बागेवाडीकर सांगतात, खरं सांगायचं तर त्यामागे खास कारण देता येत नाही. पण सप्टेंबरमध्ये जन्म म्हणजे गर्भधारणा साधारण नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यात व्हायला हवी. हा सारा काळ आहे हिवाळ्याचा. हा काळ वर्षातला सर्वात आरोग्यदायी काळ आहे. वातावरण चांगले असतेच आणि परिणामी आरोग्यही चांगलेच असते. हिवाळ्यात शक्ती साठवायची आणि ती पुढच्या आठ महिन्यात वापरायची अशी संकल्पना आयुर्वेदात आहेच. खाल ते अंगी लागेल असा हा काळ असल्याने जननक्षमतेतही नक्कीच वाढ होत असते. त्यामुळेही कदाचित सप्टेंबरमध्ये जन्मदर अधिक असू शकतो.

आणखी एक कारण असेही सांगितले जाते की भारतासारख्या देशात लग्नसराईचा काळ हा एप्रिल ते डिसेंबर असा सर्वसाधारणपणे असतो. गर्भधारणेसाठी हिवाळा अधिक अनुकुल असतो त्यामुळे सप्टेबरमध्ये जास्त जन्म होत असावेत. किवा थंडीच्या दिवसांत पती पत्नी जवळ येण्याचे प्रमाण अधिक असते व त्यातूनही हे अपघात होत असावेत असेही सांगितले जाते.

Leave a Comment