
आपल्या देशाचे ग्रामीण आणि शहरी असे दोन ठळक भाग नेहमीच केले जातात. या भागातील व्यवसायाची आणि रोजगाराची क्षेत्रेही भिन्न भिन्न आहेत. त्यामुळे शहरातल्या नोकर्यांसारखे व्हाईट कॉलर्ड जॉब किवा तांत्रिक स्वरुपाच्या नोकर्या ग्रामीण भागात मिळणे काही शक्य नाही असे समजले जाते आणि म्हणूनच ग्रामीण भागातील तरुण आणि महिला सुद्धा शहरांकडे पळत चालले आहेत. शहरांमध्ये त्यांना राहण्याच्या जागा नीट मिळत नाहीत, रोजगाराचे ठिकाण घरापासून दूर असते आणि त्यातच त्यांचे आयुष्य व्यतित होते. परंतु रोजगार आणि पोटापाण्याची सोय होत आहे एवढ्या एका समाधानात आणि पोराबाळांचे शिक्षण चांगले होत आहे या आनंदात ते शहरातलेच परंतु कष्टप्रद आयुष्य कंठत असतात. पण आता ग्रामीण भाग आणि शहरी भागातले अंतर कमी होत चालले आहे. ग्रामीण भागात सुद्धा शेती वगळता अन्य क्षेत्रामधील नोकर्या आणि रोजगार उपलब्ध होत आहेत. १९८५ साली सॅम पिट्रोदा यांनी भारतात आल्यानंतर टेलिफोनची व्यवस्था बदलली तर जग बदलून जाईल असे भाकीत वर्तविले होते. ते आता खरे ठरायला लागले आहे.