नवी दिल्ली – मोदी सरकारवर नोटाबंदीनंतर विरोधकांनी नोटाबंदी अयशस्वी झाल्याचा आरोप केला होता. त्यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ज्या लोकांना काळ्या पैशांचा प्रश्न कसा सोडवावा याची समज नाही, तेच लोक नोटाबंदीनंतर बँकेत जमा झालेल्या पैशावर प्रश्न उपस्थित करत असल्याचा टोला लावला आहे.
ज्यांना नोटाबंदीचा उद्देशच समजला नाही तेच प्रश्न उपस्थित करतात – अर्थमंत्री
नोटाबंदीनंतर ९९ टक्के रक्कम जमा झाल्याची घोषणा रिझर्व बँकेने केल्यानंतर ब्लॅकमनी व्हाईट करण्यासाठी होती का? असा सवाल करत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली होती. त्या टीकेला जेटली यांनी उत्तर देताना असे प्रश्न समज नसणारेच लोक उपस्थित करत आहेत. नोटाबंदीमुळे बँकेत पैसा जमा करणारे कोण होते, हे समोर आल्याचा टोलाही त्यांनी लगवाला. चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १००० रूपये नोटांच्या एकूण रक्कमेतील ९९ रक्कम बँकेत जमा झाल्याची घोषणा रिझर्व बँकेने केली आहे.
नोटाबंदीनंतर मोदी सरकारने अशी घोषणा केली होती की, या नोटाबंदीमुळे काळ्या पैशावर लगाम लागेल व दहशतवाद्यांना देशातून पुरवली जाणारी रसद थांबवता येणार आहे. अर्थमंत्री म्हणाले, नोटाबंदीचा उद्देश हा अर्थव्यवस्थेतून नगदी व्यवहार कमी करणे आणि डिजीटल व्यवहार वाढवणे हा होता. तसेच काळ्यापैशांविरोधात लढा देणे, या माध्यमातून शक्य होणार होते. नोटाबंदीमुळे छत्तीसगढ आणि जम्मू-काश्मीरमधील नक्षलवादी व आतंकवादी कारवायांना पायबंद घालण्यास मदत झाली असल्याचेही जेटली यांनी स्पष्ट केले.