काही पुरातन संस्कृतींबद्दल रोचक तथ्ये


पुरातन किंवा प्राचीन संस्कृती म्हणताच आपल्या डोळ्यांपुढे काही ठराविक चित्रे उभी राहतात. पाषाणयुगातील मोहेनजोदारो, हडप्पा येथे सापडलेले वास्तुशास्त्राचे नमुने, शिल्पकला, भित्तीचित्रे अश्या कितीतरी वस्तूंवरून त्या संस्कृतीतील लोकांची जीवनशैली, रूढी, परंपरा यांचा अंदाज बांधता येतो. त्या त्या काळामध्ये त्या त्या संस्कृतीतील लोकांनी आपल्या गरजांप्रमाणे आपल्या समाजातील चाली रीतींचा विकास केला. त्यातील काही चालीरीती थोड्या अजब ही होत्या.

अॅझटेक संस्कृतीतील योद्ध्यांनी लढाया करण्याच्या हेतूने ‘ ओब्सिडीयन ‘ नावाच्या खडकापासून तलवारीचे पाते बनविण्याची कला विकसित केली. हा खडक ज्वालामुखीतील लाव्हा जमिनीवर येऊन थंड झाल्यावर तयार होतो. हा खडक वापरून तयार केलेली तलवारीची पाती दातेरी आणि अतिशय तीक्ष्ण धारेची असत. ही पाती इतकी टणक आणि मजबूत असत की ती तोडणे हे अश्यक्यप्राय काम असे. त्याचप्रमाणे, या संस्कृतीमध्ये, नवजात शिशुचा जन्म हा युद्धासामान अटीतटीचा प्रसंग मानला जात असे. बाळंतपणाच्या दरम्यान जर स्त्रीला मृत्यू आला, तर एखाद्या युद्धात कामी आलेल्या योद्ध्याप्रमाणे तिला मान दिला जात असे.

प्राचीन इजिप्शियन संस्कृतीमध्ये, इजिप्शियन राजांच्या समाधी बनविण्याच्या कामी कारागिरांची नेमणूक केली जात असे. या कारागिरांना समाजामध्ये मानाचे स्थान असे. कामाच्या ठिकाणीही त्यांना भरपूर पगार, रजा मिळत असे. इतकेच नाही तर त्यांच्या घरामध्ये राहणाऱ्या स्त्रीयांना जर मासिक धर्म असेल, तर त्या कारागिरांना घरातील स्त्रियांची काळजी घेता यावी यासाठी देखील रजा दिली जात असे. तसेच या संस्कृतीमध्ये ज्या व्यक्तींची वाढ खुंटली असेल, किंवा ज्या व्यक्ती खुज्या असतील त्यांना ही समाजामध्ये मानाचे स्थान होते. अश्या व्यक्ती जन्मजात दैवी शक्ती घेऊन येतात असा समज असल्याने खुज्या व्यक्तींना आदराने वागविण्याची रीत होती.

प्राचीन पार्शियन संस्कृतीमध्ये एक मोठी विचित्र परंपरा होती. कुठलाही निर्णय घ्यायचा झाल्यास तो निर्णय घेऊन पर्शियन लोक मनसोक्त मद्यपान करीत असत. मद्यपान केल्यानंतर ही, आधी घेतलेल्या निर्णयावर कुठलेही वादंग झाले नाहीत किंवा मद्याच्या धुंदीत असूनही सगळ्यांना घेतलेला निर्णय बरोबर वाटला तर मगच तो निर्णय सर्वमान्य होत असे.

मायन संस्कृतीतील लोकांनी न चावणाऱ्या मधमाश्यांची जात विकसित करुन त्यांचे पालन करण्याच्या कामात निपुणता मिळविली होती. मधमाशीला मायन संस्कृतीमध्ये अतिशय महत्वाचे स्थान होते. मधमाशी हे पवित्रतेचे प्रतीक समजले जात असल्याने प्रत्येक घरामध्ये मधमाश्यांचे पोळे असे. काही पोळी तर अगदी ८० वर्षे जुनी असूनही त्यावर मधमाशा असल्याचे सांगितले जाते. ही पोळी एका पिढीकडून पुढील पिढीकडे हस्तांतरित होत असत.

इसवी सन १००० च्या आसपास अस्तित्वात असलेल्या इन्का संस्कृतीमध्ये मेंदूच्या शस्त्रक्रिया करणारे निपुण शल्यचिकित्सक अस्तित्वात होते. इसवी सन १४०० पर्यंत ह्या शल्य चिकित्सकांनी इतकी निपुणता मिळविली की या शल्यचिकित्सा केलले ९० टक्के रुग्ण बरे होत असत. कधी काही कारणांनी डोक्याला जबर दुखापत होऊन मेंदूला सूज आल्याने त्याचा भार कवटीवर पडत असे. परिणामी मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यासही अडथळा निर्माण होत असे. अश्या वेळी या शस्त्रक्रिया केल्या जात असत. इन्का संस्कृतीतील शल्यचिकित्सकांना त्या बाबत अतिशय सखोल आणि अचूक ज्ञान होते.

Leave a Comment