पावसाळ्यामध्ये मुलांच्या तब्येतीची काळजी कशी घ्याल ?


एकदा पावसाळा सुरु झाला की सगळीकडे कुठल्या ना कुठल्या तरी आजारांच्या साथी फैलाविण्यास सुरुवात होते. सर्दी खोकल्यापासून ते अगदी डोळे येणे, डेंग्यू, टायफॉईड पासून सर्व तऱ्हेचे आजार पावसाळ्यामध्ये बघायला मिळतात. या आजारांच्या विळख्यामध्ये सगळ्यात आधी सापडतात ती आपल्या घरातील लहान मुले. त्यामुळे आपल्या मुलांना आणि घरातील इतरांनाही आजारांपासून लांब ठेवण्यासाठी काही उपाययोजना करण्याची गरज असते.

घरामध्ये आणि घराच्या परिसरामध्ये स्वच्छता ठेवणे अतिशय गरजेचे असते. पावसाळ्यामध्ये डास, माश्यांचा प्रादुर्भाव जास्त बघयला मिळतो. त्यामुळे घराच्या आसपास ओळ कचरा किंवा पाणी साठू देऊ नये. पावसाळ्यामध्ये आपण वापरत असलेल्या कपड्यांची ही काळजी घ्यावी, कपडे धुतल्यानंतर ते व्यवस्थित वाळून निघतील अश्या टिकाणी वाळत घालावेत. कपडे ओलसर राहिल्याने त्यांच्यामध्ये बॅक्टेरीयांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे कपडे व्यवस्थित वाळविणे गरजेचे आहे.

मुलांना बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ घालण्याचे शक्यतो टाळावे. मुलांची रोगप्रतिकारशक्ती मोठ्या माणसांच्या मानाने कमी असते. त्यामुळे बाहेरच्या अन्नातून जंतूंचा संसर्ग होऊन आजारी पडण्याचा धोका लहान मुलांच्या बाबतीत जास्त संभवतो. पण जर काही कारणाने बाहेर खायची वेळ आलीच तर खूप आधीपासून तयार करून ठेवलेले अन्नपदार्थ ( उदाहरणार्थ सँडविचेस, सामोसे, कचोरी इत्यादी.) मुलांना खाऊ देऊ नये. त्या ऐवजी ताजे, गरम गरम खाद्यपदार्थ खाण्याचा आग्रह धरावा.

मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना भरपूर भाज्या आणि ताजी फळे खाऊ घालावीत. तसेच प्यायचे पाणीही प्युरीफायीड, किवा उकळलेले असावे. आज काल बाजारामध्ये मल्टीविटॅमिन्स आणि इतर पोषक तत्वे असलेली, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करणारी पुष्कळ टॉनिक्स उपलब्ध आहेत. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टॉनिकची निवड करावी.

लहान मुले पावसातून शाळेमधून घरी येताना त्यांच्या पायातील बूट हमखास ओले होतात. भिजलेले बूट लवकर वाळतही नाहीत. त्यामुळे खास पावसाळ्यासाठी तयार केलेले प्लास्टिक चे बूट किंवा चपला मुलांना वापरण्यास द्याव्या. ओले बूट मुलांनी सतत पायामध्ये ठेवल्यास त्यामुळे सर्दी होण्याचा किंवा ताप येण्याचा संभव असतो. तसेच मुले वापरत असलेले हातरुमाल किंवा नॅपकीन स्वच्छ धुवून detolडेटॉलच्या पाण्यामधून काढून घ्यावेत. मुलांची दप्तरे, टीफिनच्या पिशव्याही अधून मधून पावसाने विश्रांती घेतल्यावर धुवून उन्हात वळवून घ्याव्यात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment