ऑस्ट्रेलिया मध्ये सापडली वीस हजार वर्षांपूर्वीची पदचिन्हे


ऑस्ट्रेलिया मध्ये वीस हजार वर्षे जुने मानवी पावलांचे ठसे सापडले आहेत. या पावलांच्या ठश्यांवरून येथे मोठ्या प्रमाणामध्ये मानवी वस्ती त्या काळी असावी असा पुरातत्वज्ञांचा अंदाज आहे. या पाऊलखुणांच्या संदर्भात पुरातत्वद्न्यांनी अधिक शोध घेतल्यानंतर त्याबबितात काही रोचक तथ्ये उजेडात आली आहेत. सध्या ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स हा प्रांत जिथे आहे, तिथे एके काळी केवळ पाणथळ, ओलसर भूभाग होता. या भूभागामध्ये राहणाऱ्या मानवांच्या पावलांचे हे ठसे असावेत असा अंदाज आहे. हा प्रांत विलान्द्रा लेक्स या नावाने ओळखला जातो. पूर्वी जरी हा भूभाग पाणथळ असला, तरी आता मात्र हा प्रदेश अगदी कोरडा, ओसाड आहे. २००३ साली एका आदिवासी महिलेला या परिसरामध्ये पावलांचे ठसे सापडले. पुरातत्वद्न्यांना या बाबत माहिती दिली गेली असता, त्यांनी याबद्दलचे शोधकार्य सुरु केले. त्याद्वारे त्यांनी असे निदान केले की हे पावलांचे ठसे ‘ प्लेस्तोसीन ‘ या मानवजातीच्या लोकांचे असावेत. एकूण सातशे विविध प्रकारच्या पाउलखुणा पुरातत्वद्न्यांना इथे सापडल्या आहेत.

आता पर्यंत प्राचीन संस्कृतींच्या अस्तित्वाबाबत केल्या गेलेल्या शोधामध्ये सापडलेल्या पाउलखुणांपैकी, विलान्द्रा लेक्स इथे सापडलेल्या पाऊलखुणांची संख्या सगळ्यात जास्त असल्याचे सांगितले जाते. या पाउलखुणा स्त्रिया आणि पुरुष, दोघांच्याही असून त्यांच्या बरोबरच लहान मुलांच्या पावलांचे ठसे ही सापडले आहेत. काही पावलांचा ठसे तर असे उमटले आहेत की ते पाहिल्यावर ती व्यक्ती अतिशय वेगात धावत असावी असे वाटते. तर काही ठसे असे आहेत की ते पाहून त्या व्यक्तीला एकच पाय असला तरी अतिशय वेगाने तिला चालता येत असावे असे वाटते. मानवी पावलांच्या ठश्यांबरोबर तिथे एमू जातीच्या प्राण्यांचे ठसे ही सापडले आहेत. या पावलांच्या ठश्यांवरून त्या काळचे मानव कसे दिसत असावेत याचे काही आडाखे, पुरातत्वज्ञांनी बांधले आहेत. त्या काळचे मानव हे अतिशय सुदृढ, काटक शरीरयष्टीचे असून खूप उंच असावेत असा त्यांचा कयास आहे.

या सर्व पाउलखुणा पुरातत्वज्ञांना विलांद्रा लेक्स XCHYच्या परीसरामध्ये उत्खनन केल्यानंतर सापडल्या. अजूनही असेच हजारो पावलांचे ठसे तेथील मातीच्या थरांखाली दबलेले असावेत असा त्यांचा अंदाज आहे. जिथे उत्खनन करून हे पावलांचे ठसे उजागर करण्यात आले आहेत, ती जागा सध्या ऊन आणि पावसापासून बचावून ठेवण्यासाठी एका जाड कापडाने झाकण्यात आली आहे. या जागेचे पुढेमागे पर्यटनस्थळात रूपांतर करण्याचा तेथील स्थानिक प्रशासनाचा मानस आहे.