शेतकर्‍यांना फायदेशीर ठरलेय एर्गोज स्टार्टअप


बिहारच्या समस्तीपूर, बेगुसराय आणि आसपासच्या कांही गावातील ५ हजार शेतकरी सध्या एर्गोज या बंगलोरच्या स्टार्टअपमुळे चांगलेच फायद्यात आले असून आपल्या धान्य उत्पादनाची योग्य वेळी व चांगल्या दरावर विक्री करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. त्यामुळे या स्टार्टअपने शेतकर्‍यांना एक खात्रीचे शेअरमार्केट उपलब्ध करून दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सर्वसाधारण पणे शेतकरी शेतात धान्य तयार होऊन त्याच्या कापण्या झाल्या की बाजारात विक्रीसाठी नेतात. सीझनमध्ये यामुळेच मुबलक प्रमाणात धान्य उपलब्ध होत असल्याने यावेळी धान्याला म्हणावे तसे दर मिळत नाहीत व शेतकर्‍यांना मिळेल त्या भावाने धान्यविक्री करावी लागते. बंगलोरच्या एर्गोज स्टार्टअ्रपने शेतकर्‍यांसाठी आणलेली मायक्रोवेअरिंग हाऊस कल्पना शेतकर्‍यांना कमालीची फायदेशीर ठरली आहे. यानुसार कापणी झाल्यानंतर धान्य लगोलग विकण्याऐवजी ते वेअरहाऊसमध्ये साठविले जाते व ऑफ सीझनला चांगले दर असतील तेव्हा ते विकता येते.बिहारमधील शेतकर्‍यांनी या पद्धतीने मक्याला नेहमीपेक्षा २० ते ३० टक्के अधिक किंमत मिळविली आहे.

एर्गोजचे संस्थापक किशोरकुमार म्हणाले, आम्ही मोबईल अॅपच्या सहाय्याने काम करतो. मोबाईल अॅपवर शेतकर्‍यांना वेअरहाऊसमधील स्टॉक व बाजार दरांची माहिती दिली जाते. हे डिमॅट शेअर्सप्रमाणेच काम करते. शेतकर्‍यांनी साठवणीसाठी धान्य अाणले की त्याचे ग्रेडींग केले जाते व त्यानुसार दर ठरविले जातात. प्रतिक्विंटलसाठी ६ ते १२ रूपये दर आकारला जातो तर विक्री झाल्यानंतर शेतकर्‍यांना ४ ते ७ दिवसांत पैसे दिले जातात. शेतकर्‍यांला कांही कारणाने कर्ज घेण्याची गरज भासली तर ते वेअरहाऊस रिसीटचा वापर कर्ज घेण्यासाठी करू शकतात.

Leave a Comment