या विहिरीचे पाणी प्यायले की भांडायला लागतात लोक


भारतातील अनेक ऐतिहासिक जागांबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत. या दंतकथांमुळे अशा अनेक वास्तू आजही रहस्य बनून राहिल्या आहेत. मध्यप्रदेशातील शोपूर शहराजवळ असलेली तांत्रिक बावडी नावाची विहीर अशीच अनेक दंतकथा बाळगून आहे. २५० वर्षांपूर्वीही ही विहिर आता बुजविली गेली असली तरी तिच्याभोवतीचे गूढ आजही कायम आहे.

या विहिरीविषयी असे सांगितले जाते की एका तांत्रिकाने या विहिरीवर कांही तांत्रिक क्रिया केल्या व तेव्हापासून जो कुणी या विहिरीचे पाणी पितो तो भांडकुदळ होतो. म्हणजे अगदी जिवलग सख्ये भाऊ बहिणीसुद्दा या विहिरीचे पाणी प्यायले तरी त्यांच्यात भांडणे सुरू होतात. पूर्वी राजपरिवाराच्या मालकीची असलेली ही विहिर राजघराण्यातील भांडणांचेही कारण बनली होती. हिरापुरी असे नांव असलेल्या या जागेला आता गिरीधरपूर असे नांव असून एका गढीमध्ये ही विहिर आहे. या गढीचेही पडके अवशेष सध्या पहायला मिळतात.


असे सांगतात की २५० वर्षांपूर्वी राजा गिरीधरसिग गौड याने त्याच्या सत्ताकाळात या गढीत आठ विहिरी खोदल्या होत्या. त्यापैकी एका विहिरीतील पाण्यावर राजावर नाराज झालेल्या तांत्रिकाने काही तांत्रिक क्रिया केल्या. त्याचा प्रभाव पाण्यावर पडला. सुमारे १०० चौरस फूटाचा व्यास व १० फूट खोल असलेली ही विहिर त्यामुळे कलागती म्हणजे भांडणे लावणारी विहिर म्हणून ओळखली जाऊ लागली. या विहिरीजवळ एक शिवमंदिरही आहे. पूर्वी येथे आमराई होती तेथे राजे लोक नेहमीच येत असत. या गढीतील एका विहिरात आजही पाणी आहे. बाकी बुजल्या गेल्या आहेत. गिरीधरपूर हे नगर गिरीधर गौड राजानेच वसविले होते.

असेही सांगतात की येथे एकदा राजाने जादूच्या स्पर्धा भरविल्या. त्यात तांत्रिक क्रियांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका जादूगाराने ताडाचे झाड नुसत्या नजरेने तोडून दाखविले तर दुसर्‍या जादूगाराने जादूच्या सहाय्याने ते पुन्हा जोडले. मात्र त्यात थोडी फट राहिली. खूप वर्षांपर्यंत हे झाड जिवंत होते, असेही सांगतात. या ठिकाणी जाण्यासाठी नॅरोगेज रेल्वे आहे.

Leave a Comment