
भारतात शिक्षणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. मात्र प्रत्येक गावात काही शाळा-महाविद्यालये निघत नाहीत. प्रत्येक गावात तशा प्राथमिक शाळाही असतातच असेही नाही. पण आजकाल वाड्या-पाड्यांवर आणि वस्त्या-वस्त्यांवर अंगणवाड्या मात्र निघत आहेत. तूर्तास तरी या अंगणवाड्यांमध्ये या शिशू गटाला शिकविण्याचे प्रशिक्षण मिळवलेल्या ताई नेमल्या गेलेल्या नाहीत. अंगणवाड्यांची संख्या जास्त आहे आणि प्रशिक्षित शिक्षक-शिक्षिकांची संख्या कमी आहे. काही एक विशिष्ट गरज ओळखून सरकारने अंगणवाड्या तर भरपूर उघडल्या आहेत. परंतु नियोजनाच्या अभावाचे नेहमीचेच दर्शन घडवीत अंगणवाड्या उघडण्याच्या आधी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याची दक्षता घेतलेली नाही.
