जनसंपर्क शास्त्र

सध्या तरुण मुलांचा ओढा पत्रकारितेकडे आहे. माध्यमांचा विस्तार होत असल्यामुळे आणि माध्यमे व्यावसायिक होत असल्यामुळे माध्यमात काम करणार्‍या पत्रकारांना वेतनही चांगले मिळत आहे. या बाबतीत पूर्वीची परिस्थिती फार वाईट होती. परंतु केंद्र सरकारने पत्रकारां साठी एकामागे एक वेतन आयोग नेमले. १९७० सालपासून नाही म्हटले तरी केंद्र सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतन आयोगांच्या धर्तीवर पत्रकारांसाठी सुद्धा दर दहा वर्षाला एक असा वेतन आयोग नेमला गेला आहे. परंतु अशा आयोगाच्या शिफारशी बाजूला ठेवून काही माध्यमांमध्ये पत्रकारांना भारी वेतन दिले जात आहे. म्हणून आणि ग्लॅमरच्या आकर्षणापोटी का होईना अनेक तरुण-तरुणी पत्रकारितेकडे वळत आहेत.

पत्रकार म्हणजे केवळ वृत्तपत्रात किवा माध्यमात काम करणारा बातमीदार किंवा संपादक नव्हे. जनसंपर्क पत्रकारिता हा सुद्धा पत्रकारितेचाच एक भाग आहे. याची जाणीव अजून तरी बर्‍याच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली नाही. त्यामुळे पत्रकारितेकडे अनेक लोक येत आहेत, पण जनसंपर्क पत्रकारितेकडे बर्‍याच जणांचे दुलर्क्ष आहे. प्रत्यक्षात मात्र जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करणार्‍या प्रशिक्षित तरुणांची चणचण जाणवत आहे. अनेक संस्थांमध्ये जनसंपर्क विभाग तयार केले जात आहेत. परंतु त्या संस्थेमध्ये आधीच तशा प्रकारचे काम करणार्‍या एखाद्या कर्मचार्‍याला प्रशिक्षण नसतानाच जनसंपर्क अधिकारी केले जाते आणि तसेच काम रेटले जाते. कारण पत्रकारितेचे अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी जनसंपर्क अधिकारी या पदाकडे वळत नाहीत. खरे म्हणजे जनसंपर्क हे अतिशय संवेदनशील काम आहे. त्यामुळे त्या ठिकाणी प्रशिक्षित व्यक्तीच नेमली जाणे आवश्यक आहे. तशी गरज काही संस्थांना जाणवेल आणि जनसंपर्क अधिकार्‍यांचे पगार चांगले होतील. तेव्हा जनसंपर्क अधिकारी ही आकर्षक नोकरी ठरेल. तेव्हा पत्रकारितेला जाणार्‍या विद्यार्थ्यांनी निव्वळ पत्रकार म्हणून करीयर घडविण्याचा विचार करण्यापेक्षा जनसंपर्क अधिकारी या पर्यायाचाही विचार केला पाहिजे. सध्या बहुतेक विद्यापीठात पत्रकारितेचे पदव्युत्तर अभ्यासक्रम आहेत. असा एखादा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जनसंपर्क या विषयाचे विशेष ज्ञान देणारा एखादा अभ्यासक्रम पूर्ण केला तर जनसंपर्क या शास्त्राचे सविस्तर ज्ञान मिळून याही क्षेत्रामध्ये उत्तम करीयर करता येऊ शकते. 

Leave a Comment