१२ वर्षांचा संपादक, वार्ताहर आणि प्रकाशक

tripathi

बारा वर्षांचा कोवळा उत्कर्ष त्रिपाठी अलाहाबाद येथुन हस्तलिखीत साप्ताहिक ‘जागृती’ प्रकाशित करण्यासाठी प्रचंड मेहेनत घेतो आहे. पर्यावरण आणि स्त्री-भ्रुणहत्या अशा विषयांवर जागरूकता निर्माण करून देशसेवा करण्याचे ध्येय तो बाळगतो. सध्या तो अलाहाबादमधील ब्रिज बिहारी सहाई विद्यालयात आठव्या इयत्तेत शिकत आहे. या चार पानी हस्तलिखीत साप्ताहिकासाठी तो संपादक, वार्ताहर आणि प्रकाशकाबरोबरच फेरीवालाही बनतो. शिवाय तो हे हस्तलिखीत विनामुल्य वाटतो. या हस्तलिखिताची मुळ प्रत हाताने लिहुन झाल्यावर घराजवळील एका फोटोकॉपी दुकानातुन तो त्याच्या प्रती तयार करून घेतो. सध्या हे साप्ताहिक वेगवेगळ्या वयोगटातील १५० वाचकांपर्यंत पोहोचते. या वाचकांमध्ये उत्कर्षचे शाळासोबती, शिक्षक आणि शेजारी यांचा समावेश आहे.

उत्कर्षचे वडील हरिप्रसाद एक कोचींगसंस्था चालवितात. सुमारे वर्षभरापुर्वी उत्कर्षने भारत-चीन संबंधावरील लेख एका हिंदी दैनिकात वाचला होता. या लेखाच्या वाचनानंतर त्याच्या मनात देशसेवेचे बीज रोवले गेल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली. मोठेपणी सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचा सल्लाही यावेळी त्याला वडिलांनी दिला होता. पण त्याला मात्र शालेय जीवनापासुनच देशासाठी काम करायचे होते. त्यामुळे पत्रकाराप्रमाणे काम करून लोकांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करावी असा निर्णय त्या दोघांनी घेतला. पर्यावरण आणि स्त्री-भ्रुणहत्या या विषयांचा परामर्श तो संपादकीय विभागातुन घेतो. तसेच जनतेच्या कल्याणकारी योजना आणि गरीब, कुपोषित बालकांसाठीच्या शासकीय योजनांची माहितीही तो आपल्या वाचकांना देतो. वैज्ञानिक, राजकीय नेते आणि इतर प्रभावी व्यक्तीमत्वांच्या यशकथाही त्याच्या वाचकांना वाचायला मिळतात. आता, महत्वाचा प्रश्न असा आहे की तो या सगळ्यासाठी सवड कसा काढतो? त्याच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, तो म्हणतो, “एखादे काम करण्याची तळमळ असेल तर त्यासाठी वेळ काढणे कठीण नाही. दररोज मी मासिके, दैनिके आणि इंटरनेटवरून विविध विषयांवरील माहिती गोळा करतो. रविवारी या कामासाठी मला अधिक वेळ मिळतो; या दिवशी हि माहिती मी सुसुत्रीत करतो.”

अलाहाबादमधील लोक उत्कर्षच्या या प्रयत्नांना मनापासुन दाद देतात. काशी केसखानी हे चंदनपुरमधील रहिवासी म्हणतात, “कामाविषयी आत्मीयता असेल तर सर्वसामान्य व्यक्तीही समाजासाठी कसे काम करू शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.” उत्कर्षच्या शेजारी राहणाऱ्या स्थानिक पत्रकार नूतनदेवी म्हणतात, “माझ्या दृष्टीने ही खरी पत्रकारिता… पत्रकारितेचा प्राचीन उद्देश गेल्या काही वर्षात जणु काही हरवला होता… उत्कर्षने त्या उद्देशाचे पुनरुज्जीवन केले आहे.”