यम्मी मोमोज !

momo

 झणझणीत तिखट टोमॅटोची चटणी त्यात कोथींबीर, जीरं, हिरवी मिरची, डोळयातून अन कधी-कधी नाकातूनही पाणी काढणारी ही चटणी मोमोज सोबत खातांना पोटाला काहीतरी तडक-फडक खाण्याचा आनंद देवून जाते. त्याची चव पुन्हा एकदा मोमोज खाईस्तोर जिभेवर रेंगाळतच राहते.आपल्याकडे जसे रस्त्या-रस्त्यावर वडा-पावची, आलु पोहयांची दुकाने दिसतात ना तशीच दिल्लीच्या रस्त्याच्या कडेला मोमोजची दुकाने बघायला मिळतात. छोटासा टेबल त्यावर सिंगल गॅस स्टोव्ह, कुकर, चटणीचा डबा, ग्राहकांना देण्यासाठी पेपर प्लेटस, टीशु पेपर, घरी नेण्यासाठी असल्यास कॅरीबॅग्स, एवढे साहित्य घेवून रस्त्याच्याकडेला एकदम स्टाईलीश लुकमध्ये उभे असणारे उत्तरपूर्वी मुले आणि मुली सहज बघायला मिळतात, त्यांना बघून असे जाणवते काम हे छोटे-मोठे नसतं. श्रमाची लाज कशाची ? श्रमसंस्काराची प्रतिकच ती !

मोमोज हा पदार्थ तसा मूळचा तिबेटचा पण आता दिल्लीकरांच्या जिभेवर चांगलाच रेंगाळल्यामुळे आता हा पूर्णपणे भारतीय झाला आहे. भारतात हा हिमालय, दार्जिलींग भागातून आला. मोमोजला शेजारील नेपाळ राष्ट्रानेही आपल्या देशात स्वीकार केला आहे. येवढेच नव्हे मंगोलीया, चीन, सोबत रशिया, जर्मन आणि इटली येथील खाद्य पदार्थांशी हा मिळता- जुळता आहे.जेव्हा मी पहिल्यांदा मोमोज खाल्ले त्यावेळी मला आठवण आली ती मोदकांची. त्याला कारणही तसेच आहे. कारण मोदक आणि मोमोज दिसण्यात जुळे भाऊच आहेत. दोघांच्या बनविण्यातही बरेचसे साम्य आढळते. फरक एवढाच की मोदक हे गोड असतात आणि मोमोजची चव ही त्याच्या झणझणीत चटणीत असते.

कृती
मोमोज साधारणपणे मैद्याचे बनविले जातात. मैद्यात पाणी घालुन भिजवून त्याला पिठासारखे मळायचे असते. त्यात मऊपणा येण्याकरीता यात थोडे यीस्ट किंवा बेकींग पावडर टाकायचे नंतर त्याचे छोटे-छोटे गोळे करायचे. या गोळयांना थोडे चपटे करायचे त्यात आपल्या आवडीचा कुठलाही पदार्थ टाकायचा व ज्या पद्धतीने कचोरी किंवा मोदक बनवितांना सारण भरल्यानंतर बंद करतात ना तसे बंद करायचे. आता या तयार कच्च्या मोमोजला वाफेवर शिजवा. कमीत-कमी २० मिनीटे याला शिजवून नंतर बाहेर काढा. तयार झाले उकडीचे मोमोज. जर फ्राईड मोमोज बनवायचे असतील तर या उकडीच्या मोमोजला तेलात लाल होईपर्यत तळून घ्यायचे आणि तयार झालेत स्वादिष्ट फ्राईड मोमोज.

आपल्या पसंतीचे मोमोज
मोमोज हा पदार्थ शाकाहरी आणि मांसाहरी या दोन्ही गटात मोडतो, कारण मोमोजच्या आत जे सारण असते त्यात भाज्या घातल्या की हा शाकाहरी झाला आणि चिकण किंवा मटण खिमा करून घातले तर हे मांसाहरी मोमोज झालेत.

वेज-मोमोज बनविते वेळी कोणतीही भाजी बारिक करून त्याला शिजवून घ्यायची . नंतर त्यात कांदा, टमाटर स्वादानुसार मीठ, कोथींबीर घालून त्याला चांगले मिक्स करायचे आणि हे सारण मैद्याच्या बनविलेल्या छोटया चपटया गोळयात घालून वरील दिलेल्या माहितीनूसार उकडीचे किंवा फ्राईड वेज मोमोज तयार. आतले सारण हे पनीर, चीजही टाकून बनविता येते.

नॉन-वेज मोमोजमध्ये चिकन किंवा मटन उकडून त्याचा खिमा करून त्यात गरम मसाला (मिरे, कलमी, मोठी वेलची, जायफळ, शाहजीरे याला भाजून बारीक करणे), कांदा, लसून, अदरक, मिर्ची, टमाटर, कोथींबीर स्वादानुसार मीठ या सगळयांचे मिश्रण करून मैद्याच्या केलेल्या गोळयात याचे सारण भरले जाते. यालाही हवे तसे उकडीचे किंवा फ्राईड आवडीनूसार करून खाता येते.

चटणी
मोमोज चटणी ही तोंडाला आणि डोळयांनाही पाणी आणणारी असते. जेवढी चटणी करायची, तेवढे टमाटर, कोथींबीर, हिरवी मिर्ची, लाल तिखट, भाजलेले जिरे बारीक वाटून घेणे, थोडे हिंग, स्वादानुसार मीठ टाकुन घट्ट होईपर्यत चागंले उकडून घ्यायचे. झणझणीत चटणी तयार. या चटणीसोबत मोमोज खाण्याची जी मजा आहे ती खाल्यावरच कळते.

मोमोज आणि मोदक नावात किती साम्य आहे गणरायाचे हे प्रिय नैवैद्य परदेशात जाता-जाता मोदकांचे मोमोज झालेत. मात्र ज्या आवडीने आपण मोदक वर्षातून एकदा प्रसाद म्हणून खातो परदेशात त्याला येवढे पसंत केले गेले की त्याचे थोडे स्वरूप बदलून त्याला दैनदिन जीवनात स्थान दिले गेले.
चला मग आपणही एकदा मोमोज बनवून पाहू !

अंजु कांबळे-निमसरकर

सौजन्य – महान्यूज