महिलांसाठी करिअरचे नवे क्षेत्र

सध्या आपल्या देशात कामाला माणसे मिळत नाहीत अशी ओरड सततच ऐकायला यायला लागली आहे. मोठ्या प्रमाणावर सेवा क्षेत्र खुले झाले आणि आर्थिक विकासाला गती आली की अशी स्थिती निर्माण होतच असते. पण आपल्या देशात माणसे मिळत नाहीत याचा अर्थ माणसेच नाहीत असा मात्र नाही. माणसे आहेत खूप पण योग्य त्या कामाला योग्य माणूस मिळत नाही ही खरी अडचण आहे. मुळात आपल्या देशात अजूनही  बायकांनी नोकरी करायची नसते असेच ठरलेले आहे. महिला घराबाहेर पडल्या आहेत आणि पुरुषांच्या बरोबरीने काम करायला लागल्या आहेत असे कितीही सांगितले जात असले तरीही शब्दशः घराबाहेर न पडलेल्याही लाखो बायका आहेत आणि घराबाहेर पडल्या असल्या तरीही कसलाही नोकरी धंदा न करणार्‍याही लाखोच काय पण करोडो महिला आहेत. त्यातल्या काही महिला नोकरी धंदा करून संसाराला हातभार लावावा असा विचार करीतही असतात पण त्यांना आपल्याला ‘शोभेसा’ जॉब मिळत नाही. माणसे न मिळण्यामागची नेमकी हीच अडचण आहे. ज्या ज्या कामांसाठी माणसे मिळत नाहीत त्या कामांत वाहने चालवण्याच्या कामाचा  समावेश होत असतो. ‘काय करावे ? गाडी आहे पण ती चालवायला ड्रायव्हर नाही. म्हणून गाडी घरात ठेवून दुचाकीवर जावे लागत आहे,’ असे उद्गार अनेक लोकांकडून ऐकायला मिळतात. ड्रायव्हरांच्या या टंचाईवर उपाय म्हणजे जरा हटके विचार करून या कामांत महिलांना मोठ्या संख्येने उतरवणे.

गाडी चालवणे हे महिलांचे काम नाही असा पूर्वी समज होता पण आता काही तशी स्थिती राहिलली नाही. गाड्या चालवण्याचे काही कौतुक राहिलेले नाही. बायका ट्रक चालवायला लागल्या आहेत, रेल्वेचे इंजिन चालवायला लागल्या आहेत आणि आता तर विमानही चालवायला लागल्या आहेत. अनेक श्रीमंत महिला घरच्या कारला ड्रायव्हर मिळत नाही म्हणून स्वतः आपली गाडी चालवत असतात. आता कोणत्याही वाहनाचे  स्टियरिंग बाईच्या हातात असणे यात काही नवल राहिलेले नाही पण याकडे महिलांनी अजून तर करीयरचे क्षेत्र म्हणून पाहिलेले नाही. आता मात्र घरच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून  सरसकट बाईला नेमले जावे इतपत प्रयत्न होत आहेत आणि अनेक महिला या कामाकडे महिलांनी करायचे करीअर म्हणून पहायला लागल्या आहेत. निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालवण्याचे प्राथमिक धडे घेऊन या कामात उतरायला हरकत नाही. दिल्लीतल्या सखा या प्लेसमेंट सर्विसने महिलांना ड्रायव्हर म्हणून नोकर्‍या लावायला आणि त्याआधी त्यांना प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली आहे. महिला ड्रायव्हरांना संघटित करून त्यांना या क्षेत्रात रुळवण्यासाठी मुंबई, कोलकत्ता याही शहरांत फॉर शी-ओरिक्स, वीरा, एव्हिस, प्रियदर्शिनी अशाही संघटना आहेत. या क्षेत्रात उत्तम काम करण्यासाठी सुरक्षितता, स्व संरक्षण, संवाद कौशल्य, वाहनाच्या आंतील यंत्रांची माहिती, महिलांचे हक्क आणि रस्त्यांची माहिती असावी लागते. ती असली की महिला चांगले काम करू शकतात कारण मोटारींच्या ड्रायव्हरांना शोफर म्हणून काम करावे लागते आणि शोफर म्हणून करावयाची कामे महिलाच चांगली करू शकतात. आता या क्षेत्रात व्यावसायिक ड्रायव्हर म्हणून २०० ते २५० महिला कार्यरत आहेत. संधी तर अमाप आहे.  एव्हिस सर्विसेसच्या ड्रायव्हर तर दरमहा १५ ते २० हजार रुपयांपर्यंत कमाई करतात. त्यातल्या काही महिला तर चांगले इंग्रजी बोलत असतात.