केसांची निगा
निकोप आरोग्यामुळे केसांचे सौंदर्य वाढते आणि सुंदर केसांमुळे व्यक्तिमत्वाला ऊठाव येतो. केसांची योग्य देखभाल न केल्यास केस रुक्ष होणे, टोके दुभंगणे, कोंडा होणे अशा समस्या निर्माण होतात. वातावरणातील धुळ आणि प्रदूषणही केसांवर दुष्परिणाम घडविते. पुढील उपायांनी केसांची चमक व सौंदर्य वाढविता येते :
* स्वच्छता : केसांचा नेमका प्रकार जाणुन घेऊन त्यानुसार शाम्पुचा वापर करावा. काही जणांना रोज शाम्पुचा वापर करणे गरजेचे असते, काहीजणांना एक दिवसाआड, तर काहीजणांना आठवड्यातुन एकदा याची आवश्यकता भासते.
* केस वाळवणे व विंचरणे : केस वाळवण्यासाठी ड्रायरचा वापर करण्याऐवजी ते हवेनेच वाळु द्यावेत. ड्रायरच्या उष्ण हवेमुळे केसांना अपाय होतो. त्यांच्यातील ओलसरपणा शोषला गेल्याने केस निस्तेज दिसु लागतात. केस विंचरतानाही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी केसांचे लहान-लहान भाग करून रुंद दातांच्या कंगव्याने हळुवारपणे गुंता सोडवावा. त्यानंतर काळजीपुर्वक वरून खालच्या दिशेने केस विंचरावेत. ओले केस न विंचरता वाळल्यावरच विंचरावेत. ओले केस तुटण्याची अधिक शक्यता असते.
* आहार : खनिजे, जीवनसत्वे, केल्शियम, लोह यांनी युक्त असा परिपूर्ण आहार केसांच्या निकोप वाढीसाठी आवश्यक आहे.