सईच्या घरी विराजमान झाले “ट्री गणेशा”


गाजावाजा, रोषणाई, खमंग प्रसाद आणि आकर्षक गणेशमूर्ती यासर्वांची रेलचेल म्हणजेच गणेश उत्सव. आपण वर्षभर बाप्पाची वाट बघत असतो, एकदा का बाप्पाचे आगमन झाले की आपण सगळे त्यांच्या सेवेसाठी सज्ज होतो आणि जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा आपण भरलेल्या डोळ्यांनी त्यांना विसर्जित करतो. पण एकदा विसर्जनानंतर आपला बाप्पा कोणत्या अवस्थेत त्या समुद्रावर पडलेला असतो…. हे कधी आपण पाहिले आहे का ? प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्या पाण्यात विरघळत नाहीत आणि त्यामुळे गणपतीच्या देखण्या मुर्त्या विसर्जनानंतर अक्षरशः विद्रुप होऊन जातात . पण यावर महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर “ट्री गणेशा”च्या रूपाने एक अनोखा उपाय घेऊन आली आहे .

“ट्री गणेशा” ही नवखी संकल्पना दत्तात्री कोथुर या युवकाने लोकांसमोर आणली. बाप्पाच्या या मूर्तीसाठी लाल मातीमध्ये पुरेसे खत एकत्रित केले जाते. बाप्पाची मूर्ती साच्याच्या साहाय्याने घडवली जाते आणि त्यामध्ये रोपांचे काही बीज मूर्तीत रोवले जातात. ही मूर्ती मखरात ठेवण्याऐवजी कुंडीमध्ये लावली जाते. ज्यावेळी विसर्जनाची वेळ येते तेव्हा ही मूर्ती पाण्यात विसर्जित करण्याऐवजी आपल्याच घरी बाप्पाचा अभिषेक करून विसर्जनाची विधी पूर्ण केली जाते. अभिषेकची प्रकिया सतत सात ते आठ दिवस केली असता मातीची मूर्ती त्या कुंडीत मिसळली जाते आणि कुंडीतील बीजाचे रोप तयार होते. १० दिवस आपल्या घरी राहणारे बाप्पा रोपाच्या स्वरूपात आपल्या घरी आयुष्यभर राहणार ही किती आनंदाची गोष्ट आहे ना! हीच संकल्पना सोशल मीडिया तर्फे सईने सर्वांसमोर आणली आहे.

Leave a Comment