मॅरेथॉन प्रेमींसाठी या आहेत आगामी काळातील मॅरेथॉन


सध्या देशभरामध्ये निरनिराळ्या मॅरेथॉन, निरनिराळ्या कंपन्यांद्वारे, समाजकल्याण संस्थांद्वारे नेहमीच आयोजित होत असतात. या मॅरेथॉन मधून भाग घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी काळामध्ये मुंबई येथे ही अनेक मॅरेथॉन आयोजित केल्या जाणार आहेत.

हिरानंदानी पवई रन – हिरानंदानी पवई रनची कल्पना २०१२ साली अस्तित्वात आली आणि त्याच साली हा रन सर्वप्रथम आयोजित करणात आला. हा रन आयोजित करण्यामागे, हिरानंदानी ग्रुपच्या भावी प्रकल्पांसाठी निधी उभारणे, पवई भागामध्ये वास्तव्यास येण्यास लोकांना प्रेरित करणे, अशी काही कारणे होती. सुरुवातीच्या तीन वर्षांच्या काळामध्ये हा रन चार किलोमीटर आणि दहा किलोमीटर या दोन अंतरांसाठी आयोजित केला जात असे. या रन मध्ये दरवर्षी सरासरी १५०० लोक सहभागी होत असत. २०१६ साली रोटरी क्लब मुंबई लेकर्स यांच्यातर्फे आयोजित केलेल्या या रनमध्ये १०,००० स्पर्धक सहभागी झाले होते. यंदा आयोजित होत असलेल्या रन मध्ये गतवर्षीपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होतील असा अंदाज आहे. हा रन ७ जानेवारी २०१८ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये हाफ मॅराथॉन, १० किलोमीटर आणि ४ किलोमिटर असे पर्याय स्पर्धकांना निवडता येणार आहेत.

साई इंटरनॅशनल मॅराथॉन – १९१८ साली शिर्डीचे संत श्री साई बाबा यांनी समाधी घेतली होती. २०१८ साली श्री साई बाबांच्या समाधीस शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रीत्यर्थ मॅराथॉन आयोजित करण्यात येणार आहे. या मॅराथॉन च्या प्रवेशशुल्कातून जी रक्कम गोळा होणार आहे, ती सर्व रक्कम शिर्डी येथे वृक्षारोपणासाठी खर्च करण्यात येणार आहे. या निमित्त आयोजित केली जाणारी साई दिंडी ही तीन किलोमीटर, तर बाकीची अंतरे १०, २१ आणि ४२ किलोमिटर इतकी असणार आहेत. या मॅराथॉनचे आयोजन १५ ऑक्टोबर २०१७ रोजी शिर्डी येथे करण्यात येणार आहे.

सॉन्ग्स ऑफ सनराईज २१.१ – ही हाफ मॅराथॉन ( २१.१ किलोमीटर ) गोरेगाव पूर्व येथील आरे मिल्क कॉलनी येथे आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये स्पर्धकांना दहा किलोमीटर धावण्याचा पर्यायही उपलब्ध असणार आहे. सभोवतालच्या हिरव्यागार निसर्गाचा आनंद घेत स्पर्धकांना ही मॅराथॉन पूर्ण करता येणार आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन ५ नोव्हेंबर रोजी आरे मिल्क कॉलनी, गोरेगाव, मुंबई येथे केले जाणार आहे.

कळवा – पारसिक १० किलोमीटर रन – मॅराथॉन मध्ये पहिल्या प्रथमच सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांसाठी ही चांगली पर्वणी आहे. यंदाच्या मॅराथॉनचा उद्देश, लोकांना पर्यावरण सुरक्षेविषयी जागरूक करणे हा असून , या साठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ह्या मॅराथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. ही मॅराथॉन १ ऑक्टोबर २०१७ रोजी कळवा येथे आयोजित केली जाणार आहे.

ट्रायहॉक मुंबई ड्यूअॅथलॉन – मुंबई येथील मरीन ड्राइव्ह येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे वैशिष्टय असे, की या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकाने धावणे आणि सायकल चालविणे अश्या दोन्हीही स्पर्धांमध्ये भाग घ्यावयाचा आहे. ५ किलोमीटर धावणे, ४० किलोमीटर सायकल चालविणे आणि त्यानंतर परत ५ किलोमीटर धावणे, अशी ही एकूण ५० किलोमीटर अंतराची स्पर्धा असणार आहे. याबरोबरच ५ किलोमीटर धावणे , २० किलोमीटर सायकल चालविणे आणि परत ५ किलोमीटर धावणे असा एकूण ३० किलोमीटरचा ही पर्याय स्पर्धकांसाठी उपलब्ध असणार आहे. ही स्पर्धा १ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे.

Leave a Comment