‘आदर्श कर्मचारी’ होण्यासाठी इंद्रा नूयी यांचे गाईड


आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याला एक आदर्श कर्मचारी म्हणवून घ्यावयाचे असेल तर त्याकरिता आपला अहंभाव दूर ठेवावयास हवा असे सूत्र जरी सर्वमान्य असले, तरी वस्तुस्थिती मात्र यापेक्षा फार वेगळी दिसते असे पेप्सिको कंपनीच्या सीईओ इंद्रा नूयी म्हणतात. एक आदर्श कर्मचारी होण्यासाठी काही सूत्रे इंद्रा यांनी सांगितली आहेत.

यामधील पहिले सूत्र हे नवीनच नोकरी सुरु करणाऱ्या तरुण – तरुणींसाठी आहे. नवीन नोकरीच्या ठिकाणी आपला हुद्दा कुठलाही असला, तरी कामाच्या बाबतीत दूरदृष्टी असणे गरजेचे आहे. आपण करत असेलेल्या कामाच्या बाबतीतले निर्णय घेताना, त्याचे भविष्यामध्ये काय परिणाम होतील, व आपल्या निर्णयांचे फायदे – तोटे लक्षात घेऊन पुढचे पाउल उचलणे गरजेचे असते. तसेच सतत काही ना काही नवीन शिकण्याची तयारी ही व्यक्तीला नवनवे अनुभव देऊन जाते असे त्या म्हणतात. आपल्या कामाच्या पद्धतीने आपल्या सहकाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल असे वर्तन आपल्या कामाच्या जागी असावे असे इंद्रा म्हणतात.

आपल्या नेतृत्वाखाली कामाच्या काही पद्धतींमध्ये बदल करावयाचा असल्यास सर्वांनाच ते बदल सुरुवातीला पटतीलच असे नाही. इतके दिवस एखाद्या विशिष्ट पद्धतीने काम केल्यानंतर काही तरी नवीन करून बघण्यासाठी काही लोक लवकर तयार होत नाहीत. नवीन पद्धत आपल्या अंगवळणी पडेल की नाही इथपासून ते नव्या पद्धतीच्या अवलंबामुळे कुठले नुकसान तर होणार नाही, इथपर्यंत हर तऱ्हेची चिंता लोकांना सतावत असते. पण या बाबतीत धीर न सोडता, आपले म्हणणे आपल्या सहकर्मींना पटवून देणे गरजेचे असते असा सल्ला इंद्रा देतात.

आपण जरी आपल्या कामामध्ये निपुण असलो तरी वेळप्रसंगी आपल्या सहकाऱ्यांनी दिलेला सल्ला किंवा एखाद्या कामाविषयी त्यांची मते जाणून घ्यावयास हवीत. आपला हुद्दा आपण आणि आपले सहकारी यांच्या मध्ये येऊ देऊ नये, असे इंद्रा म्हणतात. समोरची व्यक्ती कोणीही असली, तिचा हुद्दा कुठला ही असला तरी तिच्याकडूनही काही तरी नवे आणि चांगले शिकण्याचा प्रयत्न सतत करायला हवा. त्यासाठी ऑफिसमधून बाहेर पडून ‘रियल लाइफ एक्स्पीरीयन्स’ घेण्याची तयारी असावी असा आग्रह इंद्रा करतात.

एखाद्या प्रकल्पाचे किंवा कामाचे यश हे कोणा एका व्यक्तीचे नसून, त्या कामामध्ये किंवा प्रकाल्पामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचे असते. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सर्वच व्यक्तींनी आपापल्या कामांचा वाटा उचलेला असतो. अश्यावेळी मिळालेल्या यशाचे श्रेय एखाद्याच व्यक्तीला न देता, किंवा आपल्याकडे ओढून न घेता, त्यामध्ये सर्वांचा वाटा आहे हे लक्षात घेणे गरजेचे असल्याचे म्हणतात. काम कुठलेही असो, जबाबदारी कितीही लहान – मोठी असो, शेवटी माणसे जोडणे महत्वाचे असे इंद्रा म्हणतात.