लखनौतील अनोखे गणेशमूर्ती संग्रहालय


लखनौतील न्यू हैद्राबाद भागात राहणार्‍या कुमकुम रायचौधरी यांनी घरातच गणेश मूर्तींचे अनोखे संग्रहालय उभारले असून गणेशाबद्दल लोकांच्या मनात भकतीभाव जागृत व्हावा यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्या सांगतात. १३ वर्षांपूर्वी त्यांनी गणेशाच्या मूर्ती जमा करण्याची सुरवात केली तेव्हा एका मूर्तीपासून ही सुरवात झाली व आज त्यांच्या संग्रही विविध प्रकारच्या ३५०० हून अधिक मूर्ती आहेत. ६०० चौरस फुटाच्या हॉलमध्ये त्यांचे हे विविधअंगी, विविधरंगी गणेश सामावले असून या संग्रहालयाची नोंद लिम्का बुकमध्ये केली गेली आहे.


कुमकुम यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या गणेश संग्रहालय कल्पनेला पती व मुलांकडूनही पूर्ण सहकार्य मिळाले. त्यांच्या या संग्रहात झुल्यावर बसलेला गणेश, क्रिकेट टीमसह छक्का मारणारा गणेश, सोफ्यावर पहूडलेला आराम करणारा गणेश, उंदरासह चेस खेळणारा गणेश, पेटी, ढोल अशी वाद्ये वाजविणारा गणेश अशा अनेक स्वरूपातील मूर्ती आहेत. त्यातील कांही सोन्याच्या, चांदीच्या, पितळेच्या, लाकडी तर कांही चिनी मातीच्या आहेत. दरवर्षी कुमकुम यांच्या घरी गणेशस्थापना केली जाते.


धोत्र्याच्या मूळाचा गणेश रूपातील आकार, साबुदाणा, राजगिरा, राजमा यापासून बनलेल्या मूर्ती तसेच गणेशाची १०१ रूपे दाखविणारी पेंटींग्जही त्यांच्याकडे आहेत. हे प्रदर्शन रोज सकाळी १० ते सायंकाळी पाच पर्यंत पाहता येते मात्र त्यासाठी ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

Leave a Comment