येथे आहे महात्मा गांधींचे मंदिर


ओरिसातील संबळपूर जिल्ह्यातील भटारा गावात आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे मंदिर आहे. विशेष म्हणजे या गावाने गाववर्गणी काढून या मंदिराचे बांधकाम केले आहे. गांधींच्या आदर्शांचे पालन करून येथे गांधींच्या प्रतिमेची पूजा दलितांच्या हस्ते केली जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर भारतमातेची मूर्ती आणि समोर अशोकस्तंभ आहे.

या मंदिरात गांधीजींची ६ फूट उंचीची काशापासून बनविलेली मूर्ती आहे. अन्य देवळातील देवांप्रमाणेच येथे गांधीजींची पूजा अर्चा केली जाते, रोज सकाळ संध्याकाळ गांधीजींची आरती म्हटली जाते व उपदेशपर प्रवचने केली जातात. गांधीवादी नेते अभिमन्यू या मंदिराविषयी सांगतात, १९२८ अस्पृश्यता संपविण्यासाठी महात्माजी मोहिम चालवित होते तेव्हा ते या गावात आले होते. गांधींचा साधेपणा व त्यांचा निग्रह पाहून गाववाले त्यांचे भक्त बनले. मात्र तरीही हरिजनांना मंदिरात प्रवेश नव्हताच. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा तोडण्यास अनेक वर्षे वाट पाहावी लागली.


१९७१ साली अभिमन्यू आमदार बनले तेव्हा त्यांनी गांधीजींच्या मंदिराचा प्रस्ताव मांडला व २३ मार्च १९७१ ला मंदिराचा शिलान्यास केला गेला. गावकर्‍यांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा केली व मंदिराचे काम सुरू झाले. महात्माजींची मूर्ती खलिकाम आर्ट कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी बनविली. ११ एप्रिल १९७४ ला या मंदिराचे उदघाटन तत्कालीन मुख्यमंत्री नलिनी सत्पथी यांच्या हस्ते झाले. या मंदिरात रोज रामधून म्हणली जाते व १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, गांधी जयंती व पुण्यतिथीला येथे विविध कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांसाठी अनेक ठिकाणांहून लोक आवर्जून येतात.

Leave a Comment