मुले सांभाळण्यासाठी ८२ लाखाचे पॅकेज


नोकरी म्हटले की सर्वप्रथम प्रश्न येतो तो किती पगार असा. अर्थात कामाच्या स्वरूपाप्रमाणे प्रत्येकाला मिळणारा पगार कमी जास्त असतो. सध्या सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणार्‍यांना भक्कम पगार पॅकेज दिली जात आहेत मात्र लंडनमधील एका श्रीमंत कुटुंबाने त्यांच्या चार मुलंाना सांभाळण्यासाठी चक्क ८२.४ लाख रूपयांचे पॅकेज देऊ केले असून या शिवाय अलिशान गाड्यांतून हिडणे, आंतरराष्ट्रीय प्रवास या सुविधाही दिल्या जाणार आहेत. या कुटुंबाने त्यांचे नांव जाहीर केलेले नाही मात्र आया हवी अशी जाहिरात युकेतील वेबसाईटवर दिली आहे.

या कुटुंबाला २ ते १५ वयोगटातील चार मुले आहेत. त्यांना त्यांच्या मुलांसाठी आया हवी आहे मात्र त्यासाठी त्यांच्या कांही अटी आहेत. उमेदवार चाईल्ड सायकॉलॉजीमधील पदवीधर असलेला, स्वतःचे मूल नसलेला, १५ वर्षांचा मुले सांभाळण्याचा अनुभव, स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेतलेला हवा. या आयाला आठवडयातून सहा दिवस सकाळी ७ ते रात्री ८ या वेळात काम करावे लागेल. तिला कार चालविता येणे आवश्यक आहे कारण मुलांना शाळेत नेणे आणणे, त्यांचा होमवर्क पाहणे हे कामही करावे लागणार आहे. दारू सिगरेटचे व्यसन असता कामा नये. हे कुटुंब आठवड्यातून ३ वेळा प्रवास करते. त्यांची लंडन, बार्बाडोस, केपटाऊन व अटलांटा येथे घरे आहेत.

योग्य आयास ८२.४ लाख पगार, स्टार शेफने बनविलेले जेवण, आंतरराष्ट्रीय प्रवास तसेच मसरेट्टी, पोर्शे, रेंज रोव्हर या गाड्यांचा वापर करता येणार आहे. या कुटुंबाला आत्तापर्यंत ३०० अर्ज आले आहेत मात्र त्यातील एकही त्यांच्या सर्व अटी पुर्‍या करणारा नाही असे समजते.

Leave a Comment