गुरमित रामरहिमच्या नावावर सात गिनीज रेकॉर्ड


बलात्कार प्रकरणात २० वर्षे तुरूंगवासाची शिक्षा मिळालेल्या गुरमित रामरहिम याच्या नावावर अनेक रेकॉर्ड नोंदली गेली असून त्यात सात रेकॉर्ड गिनीज बुकमध्ये नोंदली गेली आहेत. आपल्या फिल्म प्रमोशनसाठी बनविलेल्या महाप्रचंड पोस्टरपासून ते भारतात स्वच्छता जागृती करण्यासाठी बनविलेल्या पेटींगपर्यंत अनेक गोष्टींचा यात समावेश आहे.

सर्वात मोठे फिंगर पेंटींग बनविण्याचा विक्रम हे बाबा व शाह सतनामजी ग्रीन एस वेलफेयर यांच्या नावावर नोंदला गेला असून हे पेंटींग ३९०० चैा. मीटर आकाराचे आहे व ते २३ सप्टेंबर २०१४ रोजी सिरसा येथेच बनविले गेले. सर्वात मोठे पोस्टर बनविण्याचा विक्रम रामरहिमने केला असून हे पोस्टर १५१२ चौरस मीटर आकाराचे होते. त्याच्या एमएजी फिल्मच्या प्रमोशनसाठी ते बनविले गेले. सर्वात मोठे पोस्टर बनविण्याचे यापूर्वीचे रेकॉर्डही त्यांच्याच नावावर असून ५९६९ चौरस मीटर आकाराचे हे पोस्टर सिरसा सतनाम क्रिकेट स्टेडियममध्ये ९ सप्टेंबर २०१५ ला बनविले गेले होते. या पोस्टरने बाहुबलीचे रेकॉर्ड तोडले होते.


डेरा सच्चा सौदा एसएमजी कॉम्प्लेक्स मध्ये २३ सप्टेंबर २०१२ रोजी एकाचवेळी ७६७५ लोकांनी एकाच वेळी हात धुवून रेकॉर्ड नोंदविले होते. भारत स्वच्छता अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी हा इव्हेंट केला गेला होता. त्याचबरोबर तब्बल ७७७२३ किलो भाज्या वापरून १ हा आकडा बनविण्याचे रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. भोपळा, हिरवी मिरची, सिमला मिरची, मटार, लसूण, टोमॅटो अशा सेंद्रिय भाज्यांचा वापर करून हा जगातील सर्वात मोठा १ आकडा बनविला गेला होता. सर्वात मोठे ग्रिटींग कार्ड बनविण्याचा विक्रम यांच्याच नावावर आहे. ३९८.४२ चौरस मीटरचे हे ग्रिटींग २२ ऑगस्ट २०१५ ला केले गेले होते.

एकाचवेळी १,५०,००९ तेलाचे दिवे प्रज्वलित करण्याचे रेकॉर्डही गिनीजमध्ये नोंदले गेले असून १५३१ लोक उपक्रमात सामील झाले होते.रामरहिम यांच्या नावावर १५ फेब्रुवारी २०१७ रोजी वाढदिवसाच्या व्हिडीओ मार्फत शुभेच्छा मिळण्याचे रेकॉर्ड नोंदविले गेले असून त्याला या दिवशी ३२,२०० शुभेच्छा देणारे व्हिडीओ पाठविले गेले आहेत.गिनीज बुकने या विक्रमाची नोंद घेतली आहे.

Leave a Comment