गोड खाणे कमी करावयाचे आहे? घ्या परिणितीकडून प्रेरणा


परिणिती चोप्राचा नवा “ फॅब आणि फिट “ अवतार, नियमित व्यायाम, अतिशय काटेकोरपणे सांभाळलेला आहार आणि सकारात्मक विचारसरणीचा परिणाम म्हणता येईल. गोड पदार्थ खाण्याची अतिशय आवड असणाऱ्या परिणितीने, आपल्या आहारामधील गोड पदार्थांच्या सेवनावर नियंत्रण मिळविले, पण या चवीपासून मात्र ती अलिप्त नाही. गोड खाण्याची इच्छा असल्यास परिणिती आईस्क्रीम, चॉकलेट किंवा इतर मिठायांचे सेवन टाळून, फळे किंवा फळांचे रस, स्मूदी इत्यादींचे सेवन करते. पण या स्मूदी डबाबंद फळांचा वापर करून बनविण्याचे ती टाळते, कारण डबाबंद फळे टिकून रहावी म्हणून त्यामध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला असतो. त्यामुळे ताज्या फळांपासून तयार केलेल्या स्मूदी किंवा शेक परिणिती पसंत करते. तिच्या मते ह्या स्मूदी किंवा शेक सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहेत. त्याशिवाय गोड खाण्याची इच्छा असल्यासही साखरेचा वापर न करता तयार करण्यात येणाऱ्या या स्मूदी मुळे वजनावर नियंत्रण ठेवणेही शक्य होते. त्याच बरोबर स्मूदी साठी वापरण्यात येणाऱ्या ताज्या भाज्या आणि फळांमुळे शरीराला पोषक द्रव्ये मुबलक प्रमाणात मिळतात. परिणितीच्या पसंतीच्या स्मूदी किंवा शेक कुठले ते पाहूया.

किवी आणि हिरव्या सफरचंदा पासून तयार केलेला शेक परिणितीच्या पसंतीचा आहे. ही स्मूदी बनविण्यासाठी दोन हिरवी सफरचंदे बारीक चिरून घेऊन मिक्सरवर वाटून घ्यावीत. त्यानंतर तीन किवी चिरून ती ही मिक्सरमध्ये बारीक वाटावीत. ही स्मूदी ग्लासमध्ये काढून घेऊन, त्यावर पिस्त्याचे बारीक काप घालावेत. तसेच गाजर आणि संत्री वापरून बनविलेली स्मूदी ही परिणितीची आवडती आहे. ही स्मूदी बनविण्यासाठी दोन गाजरे किसून घ्यावीत. १०० मिलीलीटर ताज्या संत्रांच्या रसाबरोबर किसलेली गाजरे मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. त्यानंतर त्यामध्ये थोसेडे आले घालून, परत काही सेकंद मिक्सर मध्ये वाटावे. ही तयार स्मूदी ग्लास मध्ये काढून घेऊन त्यावर लाल भोपळ्याच्या बिया घालून गार्निश करावे.

खोबरे, केळे आणि चिया सीड वापरून तयार केलली स्मूदी बनविण्यासाठी शहाळ्यातील मुलायम खोबरे एका बाउल मध्ये थोडेसे कुस्करून घ्यावे. त्यामध्ये मुठभर चिया सीड आणि एक चमचा मध घालावे. ह मिश्रण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून मग ग्लास मध्ये काढून घ्यावे. त्यावर केळ्याचे काप घालून ही स्मूदी पिण्यास द्यावी.

परिणितीच्या पसंतीच्या या निरनिराळ्या स्मूदी, ज्याच्या सेवानामुळे सतत काहीतरी गोड खाण्याच्या इच्छेवर तिला नियंत्रण मिळविता आले.