बाप्पांसाठी विविध मोदकांनी बाजारपेठ सजली


देशभरात शहरांच्या चौकाचौकात तसेच घरोघर गणेशाची स्थापना झाली आहे. बाप्पांच्या पूजेत दुर्वा जशा महत्त्वाच्या, शेंदूर जसा महत्त्वाचा तसाच बाप्पांसाठी मोदकांचा नैवेद्यही महत्त्वाचा. महाराष्ट्रात घरोघरी गणपतीच्या दिवसांत एकदा का होईना उकडीच्या मोदकांचा नैवद्या बाप्पाला दाखविला जातोच. पण रोजच्या पूजच्या प्रसादासाठी विविध प्रकारचे मोदक बनविले जातात. आता घरी बनविण्यापेक्षा तयार मोदकांना अ्रधिक पसंती दिली जाते व मिठाईवाल्यांनीही यंदा विविध स्वादाचे आकर्षक मोदक बाप्पांसाठी तयार केले आहेत आणि ग्राहकांकडून त्यांना चांगली मागणीही येत आहे. हे मोदक घरच्या प्रसादासाठी तसेच भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जात आहेत.


यंदा बाजारपेठेत लखनौ मोदकांना चांगली मागणी आहे. लखनौमधून हे आकर्षक मोदक पाठविले जात असून मुंबईत त्याला सर्वाधिक मागणी आहे. खवा, मावापासून हे मोदक बनविले गेले आहेत. त्याचबरोबर बच्चे कंपनीसाठी बोर्नव्हिटा मोदकही आले आहेत. बोर्नव्हिटा घालून बनविलेल्या या मोदकांवर ड्रायफ्रूटचे टॉपिंग करून ते अधिक पोषक बनविले गेले आहेत. ते ६०० रूपये किलोने विकले जात आहेत.

नारळ, बालुशाही, खवा यांच्या मिश्रणातूनही मोदक बनविले गेले आहेत. त्यात बेसन व बुंदीचे मोदकही आहेत.केशर मोदकांचा दर ५०० ते ६०० रूपया दरम्यान असून सर्वात महाग आहेत पिस्ता मोदक. हे मोदक २ हजार रूपये किलेा आहेत. बदाम, अंजीराचे मोदकही महाग असून त्यांचे दर १२००,१४०० व १८०० रूपये किलोदरम्यान आहेत. यातही खूप व्हरायटी आहे.


चॉकलेटचे मोदक यंदाही लोकप्रियता टिकवून आहेत. त्यात मिल्क, व्हाईट अशी व्हरायटी आहे. यात ड्रायफ्रूटचे स्टफिग केलेले मोदकही आहेत. या मोदकांना तरूण वर्गाकडून विशेष पसंती आहे. हे मोदक १ महिना टिकतात.

यंदा स्ट्राॅबेरी, जांभूळ, पायनापल, बटरस्कॉच या स्वादातील मोदकही बाजारात आले असून त्यांचे दर ५०० रूपये किलोपासून पुढे आहेत.

Leave a Comment