नेपच्यून व युरेनसवर पडतो चक्क हिर्‍यांचा पाऊस


आपल्या सूर्यग्रहमालेतील अनेक ग्रह वेगवेगळ्या कारणांनी वैशिष्ठपूर्ण आहेत. पृथ्वीवर ऋतू आहेत व त्यामुळे आपण उन्हाळा पावसाळा व हिवाळा असे वातावरणाचे विविध प्रकार अनुभवतो. याच ऋतुंमुळे पृथ्वीवर जीवनही आहे. पाऊस आपल्या खूपच परिचयाचा आहे. पूर, अवर्षण, दुष्काळ या शब्दांमुळे पावसाचे महत्त्व आणखीच अधोरेखीत होत असते. पृथ्वीप्रमाणे अन्य ग्रहांवर पाणी आहे का म्हणजे जीवन आहे का याचा शोध संशोधक अनेक शतके घेत आहेत. सौरमंडळातील आत्तापर्यंतचे सर्वात लांब असलेले ज्ञात ग्रह आहेत युरेनस आणि नेपच्यून. संशोधकांनी गेल्या कांही वर्षात सातत्याने केलेल्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की या दूरच्या ग्रहांवरही पाऊस पडतो. फक्त तो पाण्याचा नसतो तर तो असतो हिर्‍यांचा. होय, आपण मौल्यवान समजून व लाखो रूपये खर्चून जे हिरे खरेदी करतो त्या हिर्‍यांचा.

संशोधकांनी केलेल्या निरीक्षणात असे दिसून आले आहे की गेले काही दिवस हा हिरे पाऊस या ग्रहांवर होतो आहे. यामागचे कारण म्हणजे या ग्रहांच्या अंतर्भागातील म्हणजे भूगर्भातील हवेचे प्रेशर इतके प्रचंड आहे की त्यामुळे हायड्रोजन व कार्बनचे बाँड तुटतात. परिणामी येथे हिर्‍यांचा पाऊस पडतो. गेली हजारो वर्षे या ग्रहांच्या बर्फमय पृष्ठभागावर हिरे जमा होत आहेत. नेपच्यून हा पृथ्वीपेक्षा १७ पट तर युरेनस १५ पट मोठा आहे. म्हणजे त्यांचा पृष्ठभाग त्याच प्रमाणात मोठा असणार व तो हिर्‍यांनी भरलेला आहे.


या दोन्ही ग्रहांवर हायड्रोजन व हेलियम वायू अधिक प्रमाणात आहेत. या ग्रहांच्या भूगर्भात ६२०० मैल खोलावर प्रचंड दाब आहे हे एका प्रयोगातून सिद्ध झाले आहे. आपल्या वातावरणात अॅटमॉसफेरिक दाबामुळे पाण्याच्या वाफेचे थंड झाल्यावर ढग निर्माण होऊन वाफेचे पाण्यात रूपांतर होते व पाऊस पडतो. कधी गाराही पडतात. नेपच्यून व युरेनस वर मिथेन आहे. तो प्रेशराईज झाला की त्यातून हैड्रोजन वेगळा होतो व कार्बनचे हिरे बनतात. वैज्ञानिकांच्या टीमने प्रयोगशाळेत याच प्रकारे मिथेनवर प्रचंड दाब देऊन त्यातून हैड्रोजन वेगळा काढला तर कार्बनचे नॅनो आकाराचे हिरे त्यांना मिळाले. अर्थात नेपच्यून व युरेनस वर पावसातून पडणारे हिरे हे चांगलेच मोठ्या आकाराचे म्हणजे लिंबे, मोसंब्यांच्या आकाराचे आहेत तर कांही खडकांएवढे मोठेही आहेत असा संशोधकांचा दावा आहे.