मेसेजला द्या लगेच प्रत्युत्तर नाही तर फोन होईल बंद


मोबाईल फोन ही आता चैनीची वस्तू राहिलेली नसून, आता गरज झाली आहे. अगदी भाजीवाल्यापासून ते कामवाल्या बाई पर्यंत, सगळ्यांच्या हातात मोबाईल फोन आल्यामुळे सर्वांच्या संपर्कात राहणे आता सोपे झाले आहे. हाच विचार करून मुलांच्याही हातात त्यांच्या पालकांनी फोन दिले. कारण हे, की मुले घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला त्यांच्याशी संपर्क करायचा झाल्यास, किंवा काही कारणाने, कुठली ही अडचण भासल्यास मुलांना पालकांशी, किंवा इतर मित्र मैत्रिणींशी संपर्क साधता यावा यासाठी मोबाईल जवळ हवा असा सूज्ञ विचार आहे. पण काही वेळा असे ही घडते की पालक मुलांना फोन करत राहतात, मेसेज ही पाठवत राहतात, पण मुले आपल्याच दुनियेत इतकी मश्गुल असतात, की त्या मेसेजचे प्रत्युत्तर देण्याचे ही भान त्यांना नसते, किंवा ‘ करू या नंतर फोन किंवा मेसेज ‘ असा विचार करून मेसेजचे उत्तर देण्याचे टाळले जाते. पण अश्या वेळी पालकांचा जीव मात्र टांगणीला लागलेला असतो. मुलांना मात्र पालकांच्या या घालमेलीची जाणीव असतेच असे नाही. या अश्या विचित्र, बिकट प्रश्नातून वाट काढली आहे एका ब्रिटीश पित्याने.

निक हर्बर्ट या ब्रिटीश इसमाने आपल्या तेरा वर्षीय मुलाला, बेन ला मोबाईल फोन घेऊन दिला खरा, पण त्याला ही तोच अनुभव आला जो साधारणपणे सर्वच मोठ्या मुलांच्या पालकांना येतो. बेन चा फोन बहुतेक वेळी ‘ सायलेंट ‘ मोड वर असे, आणि तो सतत आपल्या फोनवर काही ना काही गेम्स खेळण्यात मग्न असे. त्यामुळे आपल्या वडिलांचे आलेले मेसेज किंवा फोन तो घेत नसे. त्यामुळे निकचा जीव मात्र आपल्या मुलाशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नात अगदी मेटाकुटीला येत असे. यावर अखेरीस निकने उपाय शोधून काढला. त्याने असे अॅप तयार केले, की जे फोन वर डाऊनलोड केल्यानंतर, जर आलेल्या मेसेजचे उत्तर लगेच पाठविले गेले नाही, तर फोन आपोआप लॉक होऊन जाईल आणि फोन वर अलार्म वाजत राहील. हा अलार्म तेव्हाच बंद होईल जेव्हा मेसेजला उत्तर पाठविण्यात येईल. हे अॅप ‘ रिप्लाय ASAP’ या नावाने तयार करण्यात आले आहे. आता निकला, त्याच्या मुलाने मेसेज वाचला असेल की नाही याची चिंता करावी लागत नाही, आणि त्याचबरोबर मुलाच्या उत्तराची फर काळ वाटही बघावी लागत नाही. निकचा मुलगा बेन हा ही, फोन लॉक होऊन त्याचा अलार्म वाजत राहील या भीतीने, आपल्या वडिलांच्या मेसेजला लगेच उत्तर पाठवू लागला आहे. मुलांना लगेच जरी मेसेजचे उत्तर पाठविता आले नाही तरी, मोबाईल वरील विशिष्ट क्रमांकाचे बटन दाबल्याने, त्यांनी मेसेज पहिला आहे, पण सध्या उत्तर पाठवू शकत नाही हे पालकांना समजते. ‘रिप्लाय ASAP’ हे अॅप सध्या ब्रिटन मध्ये अँड्रॉईड युजर्स करिता उपलब्ध आहे. तसेच हे अॅप लवकरच आयफोन वरही वापरता येऊ शकणार आहे.

Leave a Comment