आम आदमी पार्टी संकटात


दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीचे मंत्री एका मागे एक भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सापडायला लागले असून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पाठोपाठ आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावरही सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सत्येंद्र जैन यांनी मनी लॉंडरिंगच्या माध्यमातून बेनामी आर्थिक व्यवहार करून परदेशी पैसे पाठवले असा त्यांच्यावर आरोप आहे. यापूर्वी सीबीआयने सत्येंद्र जैन यांची या संबंधात प्राथमिक तपासणी केली होती. या तपासणीच्या अहवालावरूनच सीबीआयने आता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जैन यांनी २०१५-१६ या वर्षात प्रयास इन्फो सोल्यूशन्स अकिचंद डेव्हलपर्स आणि मंगलायतन प्रोजेक्टस् यांच्या माध्यमातून ४ कोटी ६३ लाख रुपयांची रक्कम परदेशी पाठवली असा त्यांच्यावर आरोप आहे.

गेल्या जूनमध्ये सत्येंद्र जैन यांच्या घरावर सीबीआयची धाड पडली होती आणि सीबीआयने सत्येंद्र जैन यांच्या पत्नीकडचीही चौकशी केली होती. मात्र आपल्यावर लावले गेलेले सगळे आरोप भाजपाचे आमदार कपिल मिश्रा यांच्या चिथावणीवरून, त्यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवरून आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन लावले गेले आहेत, असा बचाव त्यांनी केला होता. त्याचवेळी सीबीआयने मात्र त्यांना काही नेमके प्रश्‍न विचारले होते आणि त्यांची उत्तरे समाधानकारकपणे मिळाली नव्हती. सत्येंद्र जैन यांनी मंत्री असताना हे सगळे उपद्व्याप केले असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.

नोटाबंदीनंतर देशात अशा प्रकारचे बेनामी व्यवहार करणारे अनेक लोक उघडे पडले असून त्यातच सत्येंद्र जैन यांचा समावेश आहे. त्यांनी बँकेतून केलेल्या काही संशयास्पद व्यवहारामध्ये बेनामी व्यवहार झाल्याचा संशय आयकर खात्याला आला होता. त्याबाबत आयकर खात्याने जैन यांच्याकडे काही विचारणा केली आणि त्यांनी २०१० ते १२ या कालावधीत ११ कोटी ७८ लाख रुपये एवढ्या रकमेचा व्यवहार कशाच्या आधारावर केला असा प्रश्‍न त्यांना केला. त्याची उत्तरे न मिळाल्यामुळे आयकर खात्याने त्यांच्यावर नोटिसा जारी केल्या आणि त्याचाच पाठपुरावा करत सीबीआयने त्यांची अधिक चौकशी केली. गेल्या जूनमध्ये ही सारी कारवाई सुरू असताना सत्येंद्र जैन आणि आम आदमी पार्टीचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी या आरोपाचा इन्कार केला होता. परंतु सीबीआयला आता काही सज्जड पुरावे मिळाले असल्यामुळे गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment