श्रीगणेश – बिझीनेस मॅनेजमेंट गुरू

bizi
आज ५ सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन. आपल्या गुरूंबद्दल आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. सध्या देशात गणेशोत्सव सुरू आहे. आपली बुद्धीची देवता गणेश याचे सुंदर रूपडे म्हणजे बिझिनेस मॅनेजमेंटचा जणू पाठच म्हणता येईल. श्रीगणेशाचा प्रत्येक अवयव व्यवसाय करताना तो कसा करावा याचे शिक्षण देणारा आहे. म्हणजे गणेश आपला बिझिनेस मॅनेजमेंट गुरूच आहे.

गणेशाला हत्तीचे मस्तक आहे. म्हणजेच त्याचे डोके मोठे आहे. मोठे मस्तक असे सुचविते की तुम्ही जेव्हा व्यवसाय करता तेव्हा तो मोठा विचार डोक्यात ठेवूनच करायला हवा. व्यवसायाच्या कल्पना स्पष्ट हव्यात आणि टार्गेटही मोठेच हवे. व्यवसाय करताना मोठे ध्येय नजरेसमोर असेल तर तशा योजना आपोआपच आखल्या जातात आणि व्यवसायात नवीन उंची नक्कीच गाठता येते. मात्र हे करताना विचाराचा ताळमेळ कुठेही सुटता कामा नये.

गणेशाचे कानही मोठे आहेत. ते सुचवितात व्यवसाय करताना सजग राहिले पाहिजे. व्यवसायाशी संबंधित प्रत्येक छोटी मोठी गोष्ट माहिती करून घेतली पाहिजे. व्यवसायाचे सूचना तंत्र मजबूत हवे आणि व्यवसायाशी संबंधित प्रत्येक बाब आपल्या कानावर पडेल अशी व्यवस्थाही हवी. म्हणजे व्यवसायाची रणनिती तयार करणे सोपे होते. गणेशाची सोंड मोठी आहे. हत्ती सोंडेच्या सहाय्याने दूर अंतराचा माग घेऊ शकतो तसेच आपला संपर्कही दूरपर्यंत असला पाहिजे. सोंड हा मजबूत अवयव आहे. तिची पकड सोडविणे सहज शक्य नसते. तसाच आपल्या कर्मचार्‍यावर आपली पकड मजबूत असायला हवी.

गणेश लंबोदर आहे म्हणजे त्याचे पोट मोठे आहे. व्यवसाय म्हणजे फायदा तोटा आलाच. कधी तोटा जास्त झाला तर तो पचविता आला पाहिजे. मोठे पोट हे पचविण्याची शक्ती अधिक असल्याचे प्रतीक आहे. तोटा झाला तरी विचलित न होता तो पचविता आला तर पुढील काळात पुन्हा नफा मिळविण्यासाठी प्रयत्न करता येतात. गणेशाचे डोळे लहान आहेत. डोळे छोटे असतील तर ध्येयावर लक्ष्य केंद्रीत करता येते. नवीन व्यवसायात बारीक लक्ष असणे फायद्याचेच असते. लहान डोळे असणार्‍या प्राण्यांची नजर तेज असते. तशीच आपलीही आपल्या व्यवसायावर बारीक नजर हवी.

गणेश एकदंत आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याची पूर्ण माहिती करून घेतली असेल तर यशाची शक्यता अधिक असते. गणपतीचा तुटलेला दात असे सांगतो की व्यवसायासाठी कांही उपलब्धता कमी असली तरी हरकत नाही. ती कधीही भरून काढता येते. अर्थात त्यासाठी आपल्या व्यवसायाचे पूर्ण ज्ञान अगोदरच करून घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment