तरी तुर्क तोचि परशु | नीतिभेदु अंकुशु | वेदांतु तो महारसु | मदकु मिरवे ॥

ganesha2
तर्कशास्त्र हाच फरश, न्यायशास्त्र हाच अंकुश आणि वेदान्त शास्त्र हाच गोड रसभरित मोदक होय.

एके हातीं दंतु | जो स्वभावतां खंडितु | तो बौद्धमतसंकेतु | वार्तिकांचा ॥

न्यायसूत्रावरील वृत्तिकारांनी निर्दिष्ट केलेला, पण स्वभावत:च खंडित झालेला जो बौद्धमताचा संकेत, तोच एका हातांतील मोडका दांत होय.

मग सहजें सत्कारवादु | तो पद्मकरु वरदु | धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु | अभयहस्तु ॥

या क्रमाने वर्णन चालविले, तर ओघानेच असे येते की, सत्तर्कवाद म्हणजेच (या गणेशाचा) वरदहस्त आणि धर्मप्रतिष्ठा म्हणजेच (त्याचा) अभयहस्त.

देखा विवेकवंतु सुविमळु | तोचि शुंडादंडु सरळु | जेथ परमानंदु केवळु | महासुखाचा ॥

निर्मळ सुविचार हाच या गणेशाचा महासुखाच्या निर्भेळ परमानंदाची जोड करून देणारा सरळ शुंडादंड आहे.

तरी संवादु तोचि दशनु | जो समताशुभ्रवर्णु | देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु | विघ्नराजु ॥

तसाच मतभेदांचा परिहार करणारा जो संवाद, तोच याचा अखंडित व शुभ्रवर्ण दांत होय. उन्मेष (म्ह. ज्ञानतेजाचें स्फुरण) हेच या विघ्नराज गणेशदेवाचे किलकिले सूक्ष्म नेत्र होत.

मज अवगमलिया दोनी | मीमांसा श्रवणस्थानीं | बोधमदामृत मुनी | अली सेविती ॥

तसेच, मला असे भासते की, पूर्वमीमांसा व उत्तममीमांसा हे याचे कर्णद्वय आहे. आणि या कर्णद्वयावर मुनिरूपी भ्रमर (गंडस्थलांतून वाहणारा) बोधरुपी मदरस सेबीत असतात.

प्रमेयप्रवालसुप्रभ | द्वैताद्वैत तेचि निकुंभे | सरिसेपणे एकवटत इभ – | मस्तकावरी ॥

तत्त्वार्थरूप पोंवळ्यांनी झळकणारी द्वैत व अद्वैत हीच दोन गंडस्थळे होत. ही दोन्ही या गणेशाच्या गजमस्तकावर जवळ जवळ अगदी खेटून भिडल्यामुळे बहुतेक एकवटच झाली आहेत.

उपरि दशोपनिषदें | जियें उदारें ज्ञानमकरंदे | तियें मुगुटीं कुसुमे सुगंधे | शोभती भलीं ॥

शिवाय ज्ञानरूप मकरंदाने ओतप्रोत भरलेली दहा उपनिषदें हीच मधुर वासाची फुलें मुकुटावर फारच शोभिवंत दिसतात.

अकार चरणयुगुल | उकार उदर विशाल | मकारु महामंडल | मस्तकाकारें ॥

या गणेशाचे अकार हे चरणद्वय, उकार हे विशाळ उदर आणि मकार हे मस्तकाचे महामंडळ आहे.

हे तिन्ही एकवटले | तेथ शब्दब्रह्म कवळलें | तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें | आदिबीज ॥

या अकार, उकार व मकार अशा तिन्हींचा एक मेळ झाला, की जो ॐकार होतो, त्यांतच सर्व वाङ्यविश्‍व सामावते, म्हणून मी सद्गुरुकृपेने त्या अखिल विश्‍वाच्या मूळ बीजाला नमन करतो.