नीलेकणींकडे अपेक्षेनुसार इन्फोसिसची धुरा


इन्फोसिसच्या मुख्य पदाचा विशाल सिक्का यांनी राजीनामा दिल्यानंतर अपेक्षेनुसार नारायण मूर्तींचे दीर्घकाळचे सहकारी व इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांच्याकडे पुन्हा एकदा इन्फोसिसची धुरा सोपविली गेली आहे. नीलेकणी यांच्या नावाची घोषणा गुरूवारी केली गेली. ते नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून काम पाहणार आहेत. विशाल सिक्का यांच्यापाठोपाठ इन्फोसिसच्या संचालक मंडळाचे सध्याचे अध्यक्ष आर. शेषसाई व सहअध्यक्ष रवि वेंकटेशन यांनीही त्यांचे राजीनामे दिले असून ते स्वीकारले गेले आहेत.

संचालक मंडळाचे सदस्य जेफरी लेहमन व जॉन एचमेंडी यांनीही राजीनामे सादर केले आहेत व ते स्वीकारले गेल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नीलेकणी यांनी इन्फोसिसमध्ये पुन्हा येऊन आनंद वाटल्याचे सांगितले आहे. नीलेकणी यांनी महत्त्वाकांक्षी आधार कार्डासाठी राबविल्या गेलेल्या यूडाई योजनेत सहभागी होण्यासाठी इन्फोसिसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता व आज त्यांची ओळख आधार कार्डचे प्रणेते अशी आहे. संस्थापक नारायण मूर्ती यांनी निवृत्तीनंतर पुन्हा २०१३ ला कंपनी जॉईन केली तेव्हाही त्यांनी नीलेकणींना परत येण्याचा आग्रह केला होता मात्र त्यावेळी त्यांनी तो मानला नव्हता. एप्रिल २००२ ते २००७ पर्यंत नीलेकणी यांनी इन्फोसिसमध्ये काम केले होते त्यावेळी ते सीईओ होते.

Leave a Comment