लोंबार्गिनीचा अल्फा वन स्मार्टफोन लाँच- किंमत १ लाख ५७ हजार


लोंबार्गिनी या लग्झरी कार्स बनविणार्‍या कंपनीने टोनिनो लोंबार्गिनी ब्रँडचा अल्फा वन हा स्मार्टफोन सादर केला असून त्याची किंमत आहे २४५० डॉलर्स म्हणजे १ लाख ५७ हजार रूपये. विशेष म्हणजे स्मार्टफोन उत्पादक कंपन्या स्पर्धेमुळे कमी किमतीत अधिक चांगल्या फिचर्सचे स्मार्टफोन बाजारात उतरविण्याच्या प्रयत्नात असताना लोंबार्गिनीने सर्वसाधारण फिचर्सचा हा फोन महागड्या किंमतीत सादर केला आहे.

या फोनची बॅक साईड इटालियन हँडमेट ब्लॅक लेदरची आहे. त्यावर कंपनीचा रेझिंग बुल लोगोही आहे.फोनला चामडी कव्हर असून बाकी फिचर्स फार खास नाहीत. या फोनला ५.५ इंची डब्ल्यूक्यू एसडी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर, अँड्राईड नगेट ओएस, ४ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल स्टोरेज ते मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ड्युअल सिम, बॅक साईडला फिंगरप्रिंट सेन्सर, क्विक चार्ज सपोर्ट करणारी ३२५० एमएएच बॅटरी दिली गेली आहे. २० एमपीचा रियर कॅमेरा, ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा सेंसरसह दिला गेला आहे. तसेच पुढच्या बाजूला दोन स्पीकर दिले गेले आहेत. हा फोन यूके व यूएई मध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला गेला आहे.