यात्रा किन्नौर कैलासची


किनौर कैलासची यात्रा आपल्याला भगवान शिवाच्या सुंदर स्थानाकडे घेऊन जाते. या स्थानाचे मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे या पर्वताच्या शिखरावर सरळसोट उभे असलेलले, ८० फूट उंचीचे शिळारूपी शिवलिंग. ज्या दिवशी हवामान अगदी स्वच्छ असते त्या दिवशी वेगवेगळ्या रंगांमध्ये या शिवलिंगाचे दर्शन होते. ही यात्रा पूर्ण करण्यासाठी भाविकांना दोन दिवसाचा अवधी लागतो.

हिंदू पौराणिक कथांच्या अनुसार किन्नौर कैलासाच्या स्थानाला अतिशय महत्व आहे. किन्नौर कैलासाच्या शिखराजवळ असलेल्या पार्वती कुंडाचे निर्माण पार्वतीने स्वतः केले होते. पार्वतीने येथेच अनेक वर्षांसाठी तप केले. शिव- पार्वतींची भेटही इथेच झाल्याची आख्यायिका आहे, त्यामुळे येथील उद्यानाला ‘आशिकी उद्यान’ असे नाव देण्यात आले आहे. पुराणांमध्ये असा ही उल्लेख सापडतो की दर हिवाळ्यामध्ये किन्नौर कैलासाच्या शिखरावर सर्व देवी-देवतांच्या भेटी होत असतात. याच कारणाने भाविक याच काळामध्ये किन्नौर कैलासाची यात्रा करतात.

किन्नौर कैलासाची यात्रा तान्गलिंग नावाच्या, सतलज नदीच्या किनारी वसलेल्या गावापासून सुरु होते. तान्गलिंग गाव समुद्रसपाटीपासून ७०५० फुटांच्या उंचीवर वसलेले आहे. तान्गलिंग या गावी दोन वेगवेळ्या मार्गांनी पोहोचता येऊ शकते. कच्च्या रस्त्याने प्रवास करून, सतलज नदीवर असलेला शोनतोंग पूल ओलांडून किंवा पोवारी इथे असलेला ‘झूला पूल’ ओलांडून तान्गलिंगला पोहोचता येते. किन्नौर कैलासाची यात्रा तितकीशी सोपी नाही. अतिशय उंचीवर असलेल्या ह्या ठिकाणी पोहोचण्यासाठीची वाट फार खडकाळ आहे. सर्वात शेवटची जी बाजारपेठ आहे, ती तान्गलिंग या गावी आहे. तिथून पुढे मात्र वस्तू खरेदी करण्यासाठी कुठले दुकान नावालाही सापडत नाही.

किन्नौर कैलासाच्या यात्रे साठी सप्टेंबर पासून नोव्हंबर पर्यंतचे दिवस योग्य आहेत. तान्गलिंग येथे पोहोचल्यानंतर पुढच्या दोन दिवसामध्ये ही यात्रा पूर्ण करता येते. तान्गलिंग पासून ते आशिकी उद्यानापर्यंतचे अंतर सात ते आठ तासांमध्ये पूर्ण करता येते. एका ओढ्याच्या किनाऱ्याने हा सुंदर प्रवास करावा लागतो. या ओढ्यामध्ये वाहणारे निर्मळ पाणी किन्नौर कैलास पर्वतराजीतून उगम पावलेले आहे. आशिकी उद्यानापाशी पोहोचेपर्यंत, या ओढ्याशिवाय दुसरा कुठलाही पाण्याचा स्रोत वाटेत सापडत नाही. आशिकी उद्यानापर्यंतच्या यात्रेला कैलास धार म्हटले जाते. आशिकी उद्याना पर्यंत पोहोचण्याच्या मार्गामध्ये, विश्रांतीसाठी दोन ठिकाणे आहेत. ‘बडा पथ्थर आणि बडा पेड’ ही ती दोन ठिकाणे आहेत. ही वाट देवदार वृक्षांच्या घनदाट अरण्यातून जाते. आशिकी उद्यान येथे विस्तीर्ण हिरवळ पसरलेली आहे. इथे यात्रेचा पहिला पडाव आहे. भाविकांना राहण्यासाठी इथे विश्रांतीगृह बनविण्यात आले आहे.

आशिकी उद्यानाहून निघाल्यानंतरच्या प्रवासामध्ये वाटेत दोन ठिकाणी थांबावे लागते. उद्यानापासून ४ किलोमीटर अंतरावर भीम द्वार नावाची, मोठमोठ्या शिळांच्या आधाराने बनलेली गुहा आहे. एका वेळेस दहा ते पंधरा लोक या गुहेमध्ये जाऊ शकतात. विश्रांतीसाठी हे एक उत्तम स्थान आहे. जवळच पाण्याचा प्रवाहही आहे. पुढील प्रवासासाठी इथून पाणी भरून घेणे आवश्यक आहे, कारण पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचेपर्यंत वाटेत कुठे ही पाणी मिळत नाही. इथून निघाल्यानंतर पार्वती कुंड हा पुढचा टप्पा, साधारण तीन किलोमीटर अंतरावर आहे. पार्वती कुंड हा लहान जलाशय गोठलेल्या स्थितीत आहे. भाविक इथे पोहोचाल्यानंतर मोठ्या आस्थेने शिव – पार्वतींची उपासना, पूजा करतात आणि आपली यात्रा सुखरूप पार पडावी अशी प्रार्थना करतात. पार्वती कुंडापासून ते किन्नौर कैलासाच्या शिखरापर्यंतचा प्रवास मात्र कठीण चढाईचा आहे. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी शारीरिक बळाची आणि इच्छाशक्तीची गरज लागते. ही वाट अतिशय खडकाळ असून, वाटेमध्ये अनेक लहान मोठ्या गुहा आणि बोगदे दिसतात. पार्वती कुंडापासून किन्नौर कैलासापर्यंतच्या वाटेवर दगडी खांब लावलेले आहेत. या खांबांची खूण लक्षात ठेऊन भाविक या वाटेने प्रवास करतात. किन्नौर कैलासाच्या शिखरावर पोहोचल्यावर दर्शन होते ते ८० फुट उंचीच्या शिलारूपी शिवलिंगाचे. हे एक धार्मिक स्थान आहे. इथे पोचल्यावर भाविक मोठ्या श्रद्धेने पूजाअर्चा करतात.

या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांनी चांगल्या प्रतीचे ट्रेकिंग शूज वापरणे गरजेचे आहे. त्याचबरोबर साधारण ३० किलो सामान मावेल इतपत बॅकपॅक आणि तो भिजू नये म्हणून प्लास्टिक चे कव्हरही बरोबर असावे. सूर्यास्तानंतर इथले तापमान झपाट्याने कमी होत असल्याने उबदार कपडे बरोबर असणे अगत्याचे आहे. तसेच बरोबर टॉर्च, आवश्यक औषधे आणि हलका नाश्ता ही जरूर असावा.