उत्तमोत्तम फिचर्सवाला सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ लाँच


नवी दिल्ली – गेल्या वर्षी गॅलेक्सी नोट ७ हे मॉडेल सॅमसंग कंपनीने लाँच केले होते. तथापि, याच्या काही मॉडेल्समधील बॅटरींच्या स्फोटांमुळे प्रचंड खळबळ उडाल्यामुळे हे मॉडेल फारसे लोकप्रिय झाले नाही. कंपनीला यामुळे मोठ्या प्रमाणात बदनामी सहन करावी लागली होती.

दरम्यान न्यूयॉर्क येथे आयोजित केलेल्या शानदार कार्यक्रमात सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ या मॉडेलचे अनावरण करण्यात आले. अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा यात समावेश असून या स्मार्टफोनच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक कॅमेरा हा ड्युअल पिक्सल्स या प्रकारातील तसेच वाईड अँगल सेन्सरने युक्त असून यात २एक्स ऑप्टीकल झूम सह लाईव्ह फोकस आणि ड्युअल कॅप्चर हे प्रमुख फिचर देण्यात आले आहेत. तर ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

मॉडेल फॅब्लेट या प्रकारातील सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ हा असून ६.३ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी क्षमतेचा म्हणजेच २९६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा अमोलेड इन्फीनिटी डिस्प्ले यात देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर आहे. याची रॅम सहा जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. या मॉडेलमध्ये पहिल्यांदाच ब्लू-टुथ ५.०चा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय यात एनएफसी व एमएफसी या कनेक्टिव्हिटी असल्यामुळे सॅमसंग पे या प्रणालीच्या माध्यमातून व्यवहार करणेदेखील शक्य आहे. पहिल्यांदा सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ हे मॉडेल अमेरिकेत उपलब्ध करण्यात येणार आहे. याची १५ सप्टेंबरपासून तेथे विक्री सुरू होणार असून याचे मूल्य तब्बल ९५० डॉलर्स एवढे ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment