ब्लॅक बॉक्समुळे तीन वर्षे ताज्या राहणार भाज्या फळे


कोल्ड स्टोरमध्ये लवकर खराब होणारी फळे भाजीपाला टिकविला जातो व अशा स्टोरचा फायदा अनेक शेतकरी घेतातही. त्याच्यासाठी एक चांगली बातमी आहे. विस्तार अॅग्रीटेक कंपनीचे साहिल पीरजादा व सचिन अधिकारी यांनी ब्लॅक बॉक्स तंत्रज्ञान भारतात आणण्याची तयारी केली आहे. स्पेनमधील संशोधकांनी विकसित केलेल्या या तंत्रज्ञानामुळे फळे, भाज्या यासारखा नाशवंत माल १००० दिवस म्हणजे साधारण तीन वर्षे ताजा ठेवता येतो. या तंत्रज्ञानासाठी त्यांनी स्पेनच्या नाईस फ्रूटस कंपनीशी करार केला आहे.

पीरजादा यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरवातीला हैद्राबाद येथे ब्लॅक बॉक्स तंत्रज्ञानाचा वापर करून दोन कोल्ड स्टोर सात महिन्यात उघडली जात आहेत. त्यानंतर महाराष्ट्र व उत्तरप्रदेशातही अशी स्टोर सुरू केली जाणार आहेत. सर्वसाधारण कोल्ड स्टोरमध्ये माल टिकविण्यासाठी नायट्रोजन अथवा अन्य प्रिझर्व्हटिव्हचा वापर केला जातो मात्र नव्या तंत्रज्ञानाने बनलेल्या कोल्ड स्टोरमध्ये या पदार्थांच्या वापराची गरज राहात नाही.परिणामी फळे व भाजीपाल्याची पोषणमूल्ये कायम राहतात.

अनेकदा उत्पादन खूप झाले की मालाचे दर कोसळतात व शेतकर्‍यांना माल रस्त्यावर फेकून देण्याची वेळ येते. अनेक शेतकर्‍यांना कोल्ड स्टोरेज मध्ये माल ठेवणे परवडत नाही. अशा शेतकर्‍यांकडून विस्तार अॅग्रीटेक थेट खरेदी करेल व मालाचे दर उतरले असतानाही त्यांना चौपट दर देणार आहे असे समजते. शेतकर्‍यांकडून खरेदी केलेला हा माल कंपनी त्यांच्या अटींवर निर्यात करणार आहे.

Leave a Comment