नोटबंदी आणि नव्या नोटा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ नोव्हेंबर २०१६ ला अचानक टिव्हीवर दिलेल्या संदेशात चलनातील ५०० रूपये व १ हजार रूपये मूल्याच्या नोटा रद्द केल्याची घोषणा केली आणि त्यामुळे रातोरात सर्वसामान्य नागरिकांसह धनाढ्य, लब्धप्रतिष्ठित सार्‍यांची एकच दाणादाण उडाली. नोटबंदीच्या हेतूवर विविध प्रतिक्रियाही आल्या आणि नोटांच्या टंचाईचा सामनाही नागरिकांना करावा लागला. मात्र या घटनेला वर्ष होण्याअगोदरच रिझर्व्ह बँकेने चलनातील नोटांचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून विविध मूल्यांच्या सात नव्या नोटा चलनात आणल्या आहेत. ५०० व १ हजाराच्या जुन्या नोटा रद्द झाल्या पण त्याचवेळी १५ वर्षांपूर्वी छपाई बंद झालेल्या १ रूपयांच्या नोटांची छपाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे.


या नव्या नोटांमध्ये ५०० रूपयांच्या दोन नोटा चलनात आल्या. पाचशेची नवी नोट नुकतीच चलनात आली असून या दोन्ही नोटा म.गांधी सिरीज मधल्या आहेत. जून २०१७ मध्ये नव्याने आलेल्या पाचशेच्या नोटेत इनसेटमध्ये ए हे अक्षर दिले गेले आहे.बाकी फिचर्स मागच्या नोटेप्रमाणेच आहेत.


रिझर्व्ह बँकेने पाहताक्षणी खोटी वाटावी अशी दोन हजाराची नोटही चलनात आणली मात्र आणल्यापासूनच ही नोट चर्चेत आहे. सुरवातीला या नोटेचा गुलाबी रंग जात असल्याची चर्चा होती तर आता ही नोट सरकार लवकरच रद्द करणार असल्याची चर्चा आहे. दोन हजाराची नोट प्रथमच चलनात आणली गेली असून तिच्यावर गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. विशेष म्हणजे या नोटेच्या दोन्ही बाजूंवर इनसेट लेटर नाही. तसेच भारताची मंगळयान ही यशस्वी झालेली मोहिम दर्शविणारी ही नोट आहे.या नोटेत चीप बसविली असल्याची अफवा हि काही काळ चर्चेत होती.


येणार येणार अशी चर्चा असलेली ५०० व १०० या नोटांच्या मधल्या किंमतीची २०० रूपयांची नोट अखेर सप्टेंबरमध्ये उपलब्ध होत आहे. २०० रूपये मूल्याची नोटही प्रथमच चलनात आणली जात आहे. वेगळ्याच रंगाची ही नोट अजून नागरिकांच्या हातात आलेली नाही.

रिझर्व्ह बँकेने ५० रूपयांच्या नव्या नोटाही लवकरच चलनात येत असल्याचे जाहीर केले आहे. म.गांधी सिरीजमधल्या या नोटेवर भारतीय संस्कृतीचा वारसा सांगणार्‍या हंपी रथाचे चित्र आहे. ही नोटही नव्या रंगात येत आहे.


२० रूपयांच्या नव्या नोटाही लवकरच चलनात दाखल होत आहेत. म.गांधी सिरीज २००५ प्रमाणेच त्या आहेत. फक्त त्यांच्या नंबर पॅनलमध्ये एस हे अक्षर दिले गेले आहे. १० रूपयांच्या प्लॅस्टीक नोटाही देशातील कांही राज्यात उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत. तसेच १ रूपयांच्या नोटांची छपाई पुन्हा सुरू झाली असून नव्या नोटा गुलाबी हिरव्या रंगाच्या आहेत. बाकी डिझाईनमध्ये कोणताही बदल केला गेलेला नाही. १ रूपयाच्या नोटेवर वित्त मंत्रालयाच्या सचिवांची सही असते व ती सरकार जारी करते तर बाकी नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनरची सही असते व या नोटा रिझर्व्ह बँकेकडून जारी केल्या जातात.

Leave a Comment