‘या’ रणरागिणीमुळे एका गावाला मिळाली ७० शौचालये


दिल्ली विद्यापीठातील समाजशास्त्र या विषयाच्या पदवीधर असलेल्या उष्मा गोस्वामी या तरुणीला, आपण समाजासाठी काहीतरी करावे, आपल्या ज्ञानाचा समाजकल्याणासाठी उपयोग व्हावा असे वाटत असे. शहरी आणि ग्रामीण जीवनातील फरक, तिथल्या जीवनशैली, सोयी – सुविधा, वेगवेगळ्या वर्गांमधील लोकांची राहणी हा उष्माच्या अभ्यासाचा विषय होता. २०१६ साली उष्मा हिची SBI युथ फॉर इंडिया फेलोशिप साठी निवड करण्यात आली. या फेलोशिप अंतर्गत उष्मा हिने ‘धन फाउन्डेशन’ या समाजसेवी संस्थेसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. ही संस्था दक्षिण भारतातील प्रांतामध्ये कार्यरत आहे. आपल्या सवयीच्या वातावरणातून बाहेर पडून काम करण्याची संधी उष्माला मिळाली. वर्षभरासाठी ह्या संस्थेबरोबर उष्माला काम करायचे होते. त्यासाठी ती मैसूर जिल्ह्यातील बन्नुर होबल्ली नावाच्या लहानशा गावामध्ये पोहोचली. गावामध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांचे आपापसातील वादविवाद कायद्याच्या कचाट्यात न सापडता सामोपचाराने सोडविण्याची जबाबदारी उष्माला देण्यात आली. पण या कामात मुख्य अडचण होती, ती भाषेची. ग्रामस्थांना आणि उष्माला परस्परांच्या भाषा अवगत नसल्यामुळे कुठल्याही प्रकारचा संवाद साधणे अवघड होऊन बसले. यावर उष्माने उपाय शोधून काढला. गावातील अंगणवाडीमध्ये जाऊन तिथे येणाऱ्या मुलांबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न उष्माने सुरु केला. हळूहळू ग्रामस्थांची भाषा उष्माला बोलता, समजून घेता येऊ लागली.

भाषेची अडचण दूर झाल्यानंतर उष्माने ग्रामस्थांशी संवाद साधित त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, कित्येक ग्रामास्थांना आधार कार्ड बद्दल माहितीच नसल्याचे तिला समजले. आधार कार्डचे महत्व ग्रामस्थांना पटवून देऊन, त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार करवून घेऊन, उष्माने अनेक ग्रामस्थांची आधार कार्ड साठी नोंदणी केली. गावामध्ये मुख्य प्रश्न होता तो म्हणजे शौचालयांच्या आभावाचा. गावामधील अनेक कुटुंबांच्या घरामध्ये किंवा घराजवळ शौचालये नव्हती. याचा जास्त त्रास महिलांना होत असे. त्यामुळे उष्माने ग्रामस्थांना शौचालयाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ग्रामस्थांनी उष्माचे बोलणे मनावर घेतले नाही. त्यावेळी उष्माने शाळांमधून शिकत असलेल्या ग्रामस्थांच्या मुलांना शौचालयाचे महत्व पटवून देण्यास सुरुवात केली. जेव्हा मुलांनीही शौचालयाचा आग्रह धरला तेव्हा मात्र ग्रामस्थांना उष्माचे म्हणणे पटले. अखेरीस उष्मा च्या दहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले. आज या गावामध्ये सत्तर कुटुंबांनी शौचालये तयार करून घेतली आहेत. या कामी त्यांना सरकारी अनुदानेही देण्यात येणार आहेत.

Leave a Comment