श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी ४० किलोचे सुवर्ण अलंकार


पुणे – यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करीत असून भाविकांनी सढळ हाताने आणि श्रद्धेने अर्पिलेल्या सोन्यातून त्यानिमित्ताने ४० किलो वजनाचे सुवर्ण अलंकार बनविण्यात आले आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी ही विशेष ज्वेलरी पीएनजी ज्वेलर्सतर्फे तयार करण्यात आली आहे.

या ज्वेलरीमध्ये ९.५ किलो वजनाचा रत्नजडित सुवर्ण मुकुट, ७ जाळ्या, ७०० ग्रॅम वजनाचे सुवर्ण शुंडाभूषण, सूर्यकिरणाचा आभास निर्माण करणारे २ किलो वजनाचे सुवर्ण कान,तब्बल ४,००० सुवर्ण फुलांच्या नक्षीपासून तयार करण्यात आलेला सुवर्णपोषाख, ३.५ किलो वजनाचे सुवर्ण – रत्नजडीत उपरणे, ६.५ किलो वजनाचे सोवळे आणि पांढर्‍या रत्नांचे कोंदण असलेला १ किलो वजनाचा सुवर्ण हार, प्रभावळ यांचा समावेश आहे.

सोने व मौल्यवान रत्नांचा समावेश या दागिन्यांमध्ये करण्यात आला आहे. या सर्व दागिन्यांवर ४० कारागीरांनी ५ महिने कलाकुसर केली आहे, अशी माहिती पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ, कार्यकारी संचालक पराग गाडगीळ, कारागीर शरणकुमार रतकलकर यांनी दिली.​​

Leave a Comment