ममतांचा बुलडोझर


महाराष्ट्रात मीरा भायंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाल्याचा समारंभ सुरू असल्यामुळे अशाच प्रकारे प. बंगालमध्ये झालेल्या निवडणुकीकडे आपले लक्ष नाही. तिकडे सात नगरपालिकांच्या निवडणुका एकदम झाल्या. त्यांचा निकाल सर्वांना चकित करणारा ठरला आहे कारण या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने सर्वांचाच सफाया करून टाकला आहे. या सातही नगरपालिकांत तृणमूल कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. एकूण १४८ जागांसाठी मतदान झाले होते. आणि त्यातल्या १४० जागा तृणमूलने जिंकल्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या विरोधकांना केवळ आठ जागा मिळाल्या आहेत. जागा जिंकण्याचे हे प्रमाण पाहिले म्हणजे तृणमूल कॉंग्रेसने आपल्या विरोधकांचा किती सफाया केला आहे याचा अंदाज येतो.

प. बंगालच्या राजकारणात डाव्या आघाडीचा वरचष्मा असल्याचे मानले जाते. कारण या आघाडीने बंगालवर ३५ वर्षे राज्य केले आहे. पण ममता बॅनर्जी यांनी त्यांची नांगी अशी काही ठेचली आहे की आता पुन्हा म्हणून ही आघाडी कधी तिथे सत्तेवर येईल अशी शक्यता नाही. या सात नगरपालिकांच्या निवडणुकीत डाव्या आघाडीला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. एकेकाळी सत्तेवर असलेल्या डाव्या आघाडीची ही हालत पाहिली म्हणजे तिचे या राज्यातले अस्तित्व संपल्यात जमा आहे असे म्हटल्यावाचून रहावत नाही. कॉंग्रेसने तर डाव्या आघाडीच्या पूर्वी म्हणजे १९७७ पर्यंत या राज्यात सततच राज्य केलेले आहे पण आता अशी अवस्था आहे की, या १४८ पैकी एकही जागा त्यांना मिळालेली नाही.

भारतीय जनता पार्टीला बंगालात पाय ठेवायलाही जागा नाही असे म्हटले जातेे.म्हणूनच पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे तिथे आता जागा निर्माण करण्याच्या खटपटीला लागले आहेत. पण ते किती अवघड जाणार आहे याचा अंदाज आताचे निकाल पाहिल्यावर येतो. कारण भाजपाला या निवडणुकीत १४८ पैकी केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. या निकालात भाजपा दुसर्‍या क्रमांकावर आहे असे सांगितले जाते खरे पण हा दुसरा नंबर एवढा दीनवाणा आहे की दुसरा क्रमांक येण्याचा आनंदही साजरा करता येत नाही. या सातपैकी काही नगरपालिकांत तृणमूल कॉंग्रेसने ७० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवली आहेत. एका नगरपालिकेत तर ८९ टक्के मते मिळाली आहेत. तृणमूल कॉंग्रेसचा बुलडोझर मोठ्या ताकदीने फिरलेला आहे.

Leave a Comment