जॉन्सन विरोधात महिलेला २७७४ कोटींची भरपाई देण्याचे आदेश


अमेरिकन न्यायालयाने बेबी प्रॉडक्टस बनविणार्‍या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला महिलेला नुकसान भरपाई म्हणून ४१७ दशलक्ष डॉलर्स म्हणजे २७७४ कोटी रूपये देण्याचा निकाल दिला आहे. या महिलेने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यानुसार ती गेली ४० वर्षे कंपनीची बेबी पावडर वापरत असून त्यामुळे तिला गर्भाशयाचा कर्करोग झाला आहे. या पावडरमुळे कर्करोग होण्याचा धोका असल्याचा वैधानिक इशारा कंपनीने कधीच दिलेला नाही. महिलेचे म्हणणे मान्य करून न्यायालयाने वरील आदेश दिला आहे.

विशेष म्हणजे कंपनीविरोधातले चार दावे यापूर्वीही निकालात काढताना न्यायालयाने कंपनीला दोषी ठरविले आहे. नुकत्याच जिंकलेल्या दाव्यातील वादी ईवा इकवेरिया यांनी लॉस एंजेलिस येधील न्यायालयात हा दावा केला होता. त्यांना गर्भार्शयाचा कॅन्सर झाला असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. २००७ साली त्याना कॅन्सरची लागण झाली होती.

यापूर्वी व्हर्जिनियातील महिलेने सेंट लुईस न्यायालयात जॉन्सन विरेाधात याच कारणावरून ११ कोटी डॉलर नुकसान भरपाईचा दावा लावला होंता त्यात ७१५ कोटींची भरपाई कंपनीला द्यावी लागली. त्यांनाही ओव्हरीज चा कॅन्सर झाला होता. त्याही ४० वर्ष जॉन्सनची बेबी पावडर व शॉवर टू शॉवर पावडर वापरत होत्या. या निकालात न्यायालयाने कंपनीला ९९ टक्के दोषी ठरविले होते. विशेष म्हणजे कंपनीविरोधात निकाल लागल्यानंतर आत्तापर्यंत कंपनी विरोधात दावे लावणार्‍यांची संख्या लक्षणीय रित्या वाढली असून असे २४०० दावे न्यायालयात दाखल झाले आहेत.

Leave a Comment