बँक खातेदारांनो, तुम्हाला आहेत हे अधिकार


मोदी सरकारने देशातील प्रत्येक नागरिक बँकसेवेशी जोडला जावा तसेच डिजिटल इंडिया मोहिमेसाठी त्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने जनधन योजना सुरू केली. त्या अंतर्गत कोट्यावधी लोकांची बँक खाती उघडलीही गेली. मात्र अनेकंाना बँकेशी संबंधित कामे करण्यात अडचणी येतात याचे कारण त्यांना त्या कामकाजाची माहिती नसते हे एक आणि दुसरे म्हणजे बँक खातेदाराला जे अधिकार आहेत, त्यापासून ते अनभिज्ञ असतात. अगदी खाते उघडणे, कर्ज काढणे यासारखी कामेही अनेकांना अवघड वाटतात. रिझर्व्ह बँकेने यासाठी बँकींग कोअर अॅन्ड स्टॅन्डर्ड बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे बीसीएसबीआय ची स्थापना केली असून त्यानुसार बँक ग्राहकांना अनेक अधिकार दिले आहेत. त्यातील महत्त्वाचे अधिकार आपण येथे समजून घेणार आहोत.

१)खाते उघडणे- अनेकदा खाते उघडण्यासाठी बँकेत गेल्यावर कांही कारणे सांगून खाते उघड्यात अडथळे आणले जातात. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे कायम रहिवासी पत्ता नसणे हे. मात्र बँक ग्राहक अधिकारांनुसार तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात रहात असलात आणि भारतीय नागरिक असलात तर कायम रहिवासी पत्ता नाही या कारणाने बँक तुम्हाला खाते उघडण्यास नकार देऊ शकत नाही.


२) कोणीही व्यक्ती कोणत्याही बँकेतून नॅशनल इलेक्ट्रॅानिक फंड ट्रान्स्फरच्या मदतीने ५० हजारांपर्यंतची रक्कम कोणत्याही अन्य बँक खात्यात जमा करू शकते. त्यासाठी सबधित बँकेत खातेदाराचे खाते असण्याची गरज नसते.

३)समजा आपण चेक बँकेत जमा केला आहे आणि त्याच्या कलेक्शनसाठी बॅके च्या निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ लागला तर ग्राहक नुकासान भरपाई मागू शकतो. ही रक्कम साधारण व्याजदरानुसार बँकेला द्यावी लागते.

४)एखाद्या बँकेकडून आपण कर्ज घेतले असेल तर त्यासाठी सुरक्षा म्हणून कांहीतरी बँकेला द्यावे लागते. म्हणजे ते सोने कर्ज असेल, घरावरचे कर्ज असेल, कांही वस्तू गहाण ठेवून घेतलेले कर्ज असू शकेल. अशा वेळी कर्जफेड पूर्ण केल्यानंतर बँकेने तुमची अमानत १५ दिवसांच्या आत परत करायला हवी असा नियम आहे.

५)बँकेत खाते उघडताना बँक व खातेदार यांच्यात करार होत असतो. बँकेने या करारात कांही बदल केले तर त्याची माहिती किमान ३० दिवस आधी नोटिस देऊन आपल्याला द्यायला हवी.

६) अनेकदा खातेदाराच्या खात्यातून दुसराच कोणी तरी पैसे काढून घेतो. या प्रकारे अनधिकृत पैसे कुणी काढले असतील तर त्यासाठी बँक खातेदार दोषी मानला जात नाही. कारण हे सिद्ध करण्याची जबाबदारी बँकेवर असते.

७)एखादी सुविधा देण्यास बँक खातेदाराला नकार देत असेल तर त्यामागचे कारण जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार खातेदाराला आहे.

८)बँक खातेदाराची वैयक्तीक व खासगी माहिती बँकेकडे असते ती गुप्त ठेवणे हीही बँकेची जबाबदारी आहे. आपल्या सहमतीशिवाय बँक आपली ही माहिती कोणालाही देऊ शकत नाही.

९)बँकेत खाते उघडणार्‍यांसाठी बँक जात, धर्म, लिंग यावरून भेदभाव करू शकत नाही.

Leave a Comment