एका दिवसात 1000 शस्त्रक्रिया करणारा जगातील सर्वात छोटा रोबोट


ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी एक रोबोट बनविला असून हा रोबोट शस्त्रक्रिया पार पाडण्यात कुशल आहे. जगातील सर्वात छोटा रोबोट असलेला यंत्रमानव एका दिवसात 1000 शस्त्रक्रिया करू शकतो.

सुमारे 100 शास्त्रज्ञ व अभियंत्यांच्या एका टीमने या रोबोटिक आर्मचा शोध लावला आहे. त्यासाठी त्यांनी मोबाईल व अंतराळ विज्ञानातील तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. एका छोट्या छिद्रातून शस्त्रक्रिया करण्यासाठी तो खास बनविण्यात आला आहे, असे गार्डियन या वृत्तपत्राने म्हटले आहे.

‘व्हर्सियस’ असे या सर्जिकल रोबोटचे नाव ठेवण्यात आले आहे. तो पूर्णपणे माणसांसारखा दिसतो आणि लॅप्रोस्कोपिक पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करू शकतो. यात हॉर्नियाचे ऑपरेशन, कोलोरेक्टल ऑपरेशन, प्रोस्टेट ग्रंथी तसेच नाक, कान आणि गळ्याची शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे.

शस्त्रक्रियेच्या प्रचलित पद्धतींपेक्षा या पद्धतीने या शस्त्रक्रियेसाठी केवळ एक काप घेतला जातो. या रोबोटचे नियंत्रण शल्य चिकित्सक 3 डी स्क्रीनच्या मार्फत करू शकतात, असे केंब्रिज मेडिकल रोबोटिक्स या नियतकालिकाने म्हटले आहे.

Leave a Comment