नोटाबंदीच्या काळात देशातील बँकांमध्ये २३ हजार कोटी रुपयांचा घोटाळा


नागपूर – २०१६-१७ हे आर्थिक वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या नोटाबंदीमुळे बरेच गाजले. देशातील विविध बँकांमध्ये या कालावधीत अनेक गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. बँकामधील या घोटाळ्यासंबंधी चिंता व्यक्त करण्यात येत होती. आता देशातील बँकांमध्ये आरबीआयच्या आकडेवारीनुसार २३ हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा खळबळजनक खुलासा माहिती अधिकारातून झाला आहे.

या संदर्भात विविध बँकांतील सुमारे ४८० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याचेही आरटीआयअंतर्गत मिळालेल्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. माहिती अधिकारांतर्गत आरबीआयकडे याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी विचारणा केली होती. देशातील विविध बँकांमध्ये नोटाबंदीपासून नेमकी किती रक्कम जमा झाली, याची माहिती अजूनही आरबीआयकडे उपलब्ध नाही, हे देखील माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. मोजणीचे काम सुरू असल्याचे उत्तर आरबीआयकडून देण्यात आले आहे.

१ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत देशातील बँकांमध्ये १ लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे ५ हजार ७७ घोटाळे उघडकीस आले. यात राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांमध्ये झालेले प्रत्यक्ष घोटाळे किंवा आर्थिक घोटाळे आहेत. देशातील बँकांना या सर्व घोटाळ्यांमध्ये तब्बल २३ हजार ९३३.९१ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. या घोटाळ्यांकरता जबाबदार असलेल्या एकूण ४८० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बँकेने निलंबित केले आहे. या घोटाळ्यांकरता बँक प्रणालीतील त्रुटी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. बँकेचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय, असे घोटाळे होणे शक्य नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. यात सहकारी बँकांची आकडेवारी अजूनपर्यंत आरबीआयकडे आलेली नाही.

Leave a Comment