भाजपाची विजयी आगेकूच


मीरा भायंदर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने ९५ पैकी ६१ जागा जिंकून सर्वांना चित केले आहे. २०१२ साली झालेल्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाच्या हाती २१ जागा लागल्या होत्या आणि त्याही शिवसेनेशी युती करून मिळवल्या होत्या पण आता विभक्त होऊन निवडणूक लढवून स्पष्ट बहुमतच नाही तर दोन तृतियांश बहुमत मिळवले आहे. लातूर, चंद्रपूर आणि पनवेल या महानगर पालिकांत उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर भाजपाने आपली ही आगेकूच अशीच जारी ठेवली आहे. या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे अभिनंदन केले पाहिजे. या निवडणुका होण्याच्या काही दिवस आधी भाजपा आणि शिवसेना यांच्यातल्या जाहीर सवाल जबाबातली एक फेरी झाली होती. भाजपाने स्वबळावर राज्यात सरकार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले होते आणि शिवसेनेने नेहमीप्रमाणेच या सवालाला जबाब दिला होता. कोणी कधीही निवडणूक घेओ पण शिवसेना आपले बळ दुप्पट करण्याच्या निर्धाराने कामाला लागणार असल्याचे जाहीर केले होते.

अशा प्रकारच्या वल्गना करण्याची शिवसेनेची नेहमीची पद्धत आहे पण आपल्या अशा वल्गना फोल ठरून आपले हसे होत असते याचे भान शिवसेनेला नाही. त्यामुळे एका वल्गनेनंतर चपराक बसते पण त्यातून धडा शिकून शांत बसण्याचे भान येत नाही. लगेच दुसरी वल्गना आणि दुसरा पराभव येतो. तसेच आता झाले आहे. २०१२ साली या मनपात शिवसेनेला युती करून १५ जागा मिळवत्या आल्या होत्या पण आता एवढ्या घोषणा करून आणि एवढ्या बढाया मारूनही त्या जागा २२ नेणेच सेनेला शक्य झाले आहे. चला यातून उद्धव ठाकरे काही तरी बोध घेतील अशी आशा करू या. शिवसेनेच्या जागा वल्गनेच्या तुलनेत कमी आहेत पण काही प्रमाणात का होईना पण वाढल्या आहेत. राष्ट्रवादीचे तर पारच पानिपत झाले आहे. २०१२ साली या मनपात २६ जागा जिंकून सत्ता मिळवलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आता एकही जागा मिळवता आलेली नाही. कॉंग्रेसच्या जागा २० वरून १० वर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून फडणवीस सरकारच्या विरोधात अनेक प्रकारच्या कंड्या पिकवण्याचे सत्र चालवूनही या दोन कॉंग्रेस पक्षांना एवढ्या दारुण पराभवाला का सामोरे जावे लागत आहे याचा विचार त्यांनी करावयाचा आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तर या सरकारला टोमणे मारण्याची एकही संधी सोडत नाहीत. मग त्यांच्या अशा टोमण्यांचा कसलाही परिणाम लोकांवर का होत नाही?

मीरा भायंदर मनपाची ही निवडणूक मोठ्या योग्य वेळी झाली आहे. आता आता राज्यातल्या विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी होतील असे संकेत मिळायला लागले आहेत. पंतप्रधान मोदी लोकसभा आणि विधानसभांची निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विचारात आहेत. तसे त्यांनी मागेच जाहीर केले आहे. अर्थात अशा रितीने देशातल्या सर्वच विधानसभांची निवडणूक लोकसभेच्या सोबत घेता येत नाह कारण सर्वांच्या निवडणुकांच्या वेळा भिन्न भिन्न आहेत. मात्र लोकसभेची निवडणूक २१०८ च्या शेवटी म्हणजे नियोजित वेळेच्या सहा महिने आधी घेण्याचा त्यांंना अधिकार आहे. तशा त्या घेऊन २०१८ आणि २०१९ साली होणे अपेक्षित असलेल्या काही विधानसभांच्या निवडणुका त्याच वेळी घेता येतात. त्यासाठी काही राज्यातल्या निवडणुका काही महिने लांबणीवर तर काही राज्यांच्या निवडणुका काही महिने अलीकडे घेता येतात. तसे झाल्यास महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक २०१८ च्या उत्तरार्धात म्हणजे नियोजित वेळेच्या एक वर्ष आधी होऊ शकतात. त्या तशा झाल्या तर आता कोणत्याही पातळींवर राज्यातल्या सरकारला जनतेच्या पाठिंब्याची परीक्षा द्यायची नाही.

एका अर्थाने विधानसभा निवडणुकीपूर्वी होणारी ही शेवटची परीक्षा आहे आणि तिच्यात फडणवीस सरकार चांगलेच उत्तीर्ण झाले आहे. राष्ट्रीय पातळीवर येणार्‍या लोकसभा निवडणुकीची चर्चा होते तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली जाते की, या निवडणुकीत भाजपाचा मोठा विजय होणार आणि कॉंग्रेस पक्षातला अनुत्साह हे त्यामागचे मोठे कारण असणार. याचा अर्थ असा होतो की, विरोधकांची पराभूत मनोव्रृत्ती हे भाजपाचे मोठेच बलस्थान ठरणार आहे. महाराष्ट्रातही भाजपाला विरोधकांच्या खचलेल्या मनोधैर्याचा फायदा होत आहेच पण स्वत: मुख्यमंत्री फडणवीस हेही मोठ्या नेटाने कामाला लागले आहेत. त्यांचीही प्रतिमा चांगली आहे. त्यांनी शेतकर्‍यांची कर्जेे माफ करून मोठाच स्ट्रोक मारला आहे. शिवाय राज्याच्या प्रशासनात त्यांनी अनेक बदल केले आहेत. सरकारी कामाचा लोकांना असलेला जाच त्यांनी बराच कमी केला आहे. त्यांच्या सोबत काम करणार्‍या मंत्र्यांपैकी एक दोन अपवाद वगळले तर मुख्यमंत्र्यांच्या तोडीचा मंत्री कोणी नाही असे दिसते. एका अर्थी मुख्यमंत्रीच एक हाती सगळा गाडा ओढत आहेत आणि चांगल्या हेतूने काम करीत आहेत अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. तिचा लाभ त्यांना आणि भाजपाला होत आहे. मीरा भायंदर महानगरपालिकेत मिळालेला विजय हे याच प्रतिमेचे द्योतक आहे.

Leave a Comment