अजब प्रेम की गजब कहानी…


मुंबई : लैंगिक संबंधांबाबत अद्यापही भारतात उघडपणे बोलले जात नाही. पण एकमेकांवरील प्रेमापोटी लिंग परिवर्तन केलेले दोन जीव आयुष्यभरासाठी एकत्र आले आहेत. लिंगबदलानंतर स्त्रीचा पुरुष झालेल्या व्यक्तीने लिंगबदल करुन पुरुषाची स्त्री झालेल्या व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

२२ वर्षीय सुकन्या कृष्णनशी ४६ वर्षीय आरव अप्पूकुट्टन याने विवाह करण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात वृत्त ‘स्टोरीपिक’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार केरळमध्ये जन्माला आलेल्या बिंदूला आपण स्त्रीच्या शरीरात अडकलेला पुरुष आहोत, याची जाणीव झाली. तिने अखेर लिंगबदल शस्त्रक्रिया करून घ्यायचे ठरवले. तर दुसरीकडे चंदू म्हणून जन्माला आलेल्या तरुणाची आपले शरीर पुरुषाचे असले, तरी महिला असल्याची भावना बळावली होती. याच जाणीवेतून चंदूनेही लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

बिंदू आणि चंदू दोघंही योगायोगाने तीन वर्षांपूर्वी एकाच वेळी लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील रुग्णालयात आले. चंदूला नातेवाईकाचा फोन आला आणि तो मल्ल्याळम भाषेत बोलू लागला. त्याचवेळी बाजुला बसलेली एक महिलाही फोनवर मल्ल्याळममध्ये बोलत होती. परक्या शहरात मल्ल्याळम भाषेचा दुवा जुळला आणि एकाच शहरातून आल्याचे त्यांना समजले.

त्यादरम्यान त्यांना तीन तास डॉक्टरची वाट पहावी लागली, पण त्यांचे हे वाट पहाणे त्यांच्या पथ्यावर पडले. तो वेळ एकमेकांना जाणून घेण्यासाठी पुरेसा ठरला. त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले. बोलणे वाढत गेले, बिंदू-चंदूच्या भेटीगाठी वाढू लागल्या. खरे तर २२ वर्षीय चंदूच्या वयापेक्षा बिंदू दुपटीने मोठी. पण त्यांच्या प्रेमाच्या आड वय, लिंग अशा कुठल्याच मर्यादा कधीच आल्या नाहीत.

त्यानंतर बिंदूचा आरव झाला आणि तर चंदूची सुकन्या झाली. मूळगावी परतल्यानंतरही दोघे एकमेकांच्या शस्त्रक्रियेबद्दल तासनतास बोलायला लागले. सुरुवातीला आठवड्यातून एकदा होणारे फोन, दोनदा-तीनदा व्हायला लागले. हळूहळू रोजच त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. आता पुढच्या महिन्यात हे दोघे विवाहबद्ध होणार आहेत. एका मंदिरात विधीवत विवाह करण्याची त्यांची इच्छा आहे. आरव आणि सुकन्या यांच्या कुटुंबीयांचा त्यांना पाठिंबा आहे.

Leave a Comment