आहे गाढवच पण किंमत १० लाख रूपये


आजपर्यंत आपण महाग रेडा, महागडा घोडा, महागडी कोंबडी यांच्याबद्दल ऐकले असेल पण महागड्या गाढवाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे काय? नसेल तर ती करून घेऊया. आजकाल हरियानातील सोनीपत येथील एक गाढव फारच चर्चेत आले आहे. ते जगातले सर्वात महागडे गाढव आहे कारण त्याच्या मालकाने त्याची किंमत ठेवली आहे १० लाख रूपये.

गाढवाचा मालक राजसिंह याने या गुणी गाढवाचे नांव टिपू असे ठेवले आहे. तो सांगतो हे साधे गाढव नाही. सर्वसामान्य गाढवांपेक्षा ते सात इंचाने उंच आहे. त्याला ब्रिडींगसाठी खूप मागणी आहे. एका जत्रेत त्याला पाच लाख रूपयांची ऑफर आली पण राजसिंहाने हे गाढव १० लाखांच्या खाली विकायचे नाही असे ठरविले आहे. या गाढवाचे नखरेही खूप आहेत. त्याला रोजच्या आहारात ५ किलो हरबरे, ४ लिटर दूध, २० किलो गवत लागते. शिवाय जेवणानंतर गोड म्हणून लाडू लागतो. एखाद्यादिवशी त्याला लाडू मिळाला नाही तर त्याचा मूड जातो.

या गाढवाचा रोजचा खर्च आहे १ हजार रूपये. सकाळ संध्याकाळ त्याला फिरायला न्यावे लागते. बाहेर नेल्यावर मात्र ते अन्य गाढवांप्रमाणेच जमिनीवर लोळते. त्याला उन्हाचा त्रास सहन होत नाही त्यामुळे त्याच्या तबेल्यात चोवीस तास पंखा लावावा लागतो. हिमाचल, उत्तराखंड, उत्तरप्रदेशातून त्याला ब्रिडींगसाठी मागणी आहे. राजसिंह या गाढवाच्या एका ब्रिडींगसाठी १० हजार रूपये घेतो.

Leave a Comment