सुपरथिफची फेसबुकच्या मदतीने दिल्ली पोलिसांकडून धरपकड


दिल्ली पोलिसांनी सुपर थिफची धरपकड केली असून हा चोर चोरीच्या पैशातून खरेदी केलेल्या शेव्हरले क्रूझ गाडीतून चोर्‍या करण्यासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या चोराचा माग पोलिसांनी फेसबुकवरून काढला. इंटरनेटवरून माग काढल्यानंतर या चोरासाठी सापळा लावला गेला व त्यात तो अलगद अडकला असे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार २७ वर्षीय सिद्धार्थ मेहरोत्रा हा चांगल्या घरातील मुलगा आहे.त्याचे वडील बँकेत अधिकारी होते मात्र सिद्धार्थला चोरीची चटक लागली होती. त्याने मोठमोठ्या अधिकार्‍यांपासून ते राजकारणातील बड्या धेंडांपर्यंत अनेकांना चोरीचा प्रसाद दिला आहे. त्याने आत्तापर्यंत ३० पेक्षा जास्त चोर्‍या केल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे तो चोरीसाठी तळमजल्यावरची घरे निवडत असे व चोरीच्या जागी कांहीही माग ठेवत नसे. पहिल्यांदा जागेची टेहळणी करून तो मग चोरी करत असे. अनेक इमारतींच्या सीसीटिव्हीमध्ये त्याचे फोटो दिसले आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीचा तपास करताना पोलिसांनी गुगल सर्चवर चोरीतील गुन्हेगारांची नांवे टाकली व कांही शब्द टाकले. मात्र काही उपयोग झाला नाही. सीसीटिव्हीतील फोटेात सिद्धार्थ चांगल्या घरातील असल्याचे दिसत होते त्यामुळे अखेर ऑफिसर्स सन अ्रॅरेस्टेड असा सर्च दिला तेव्हा नॉयडा येथील एका चोरीप्रकरणी त्याला अटक झाली होती तेव्हाचा फोटो समोर आला. त्यावरून त्याचे फेसबुक अकौंट शोधले गेले तेथे त्याचा कारसह फोटो होता. कारच्या रजिस्ट्रेशननंबरवरून त्याचा माग काढण्यात आला व त्याला बेड्या ठोकल्या गेल्या. त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिद्धार्थकडून १ कोटी पेक्षा जास्त किमतीचे सामान पोलिसांनी जप्त केले आहे.