नवी दिल्ली – तुमची आज काही बँकेच्या संबंधित कामे असतील तर ती आजच पूर्ण करुन घ्या. जर तुम्ही आज आपली बँक संदर्भातील कामे पूर्ण केली नाही, तर तुमची मोठी पंचाईत होऊ शकते. कारण, उद्यापासून म्हणजेच २२ ऑगस्टला बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.
आजच पूर्ण करा आपले आर्थिक व्यवहार; नाहीतर होईल पंचाईत
बँक कर्मचा-यांच्या युनियन्सने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात संपाची हाक दिली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सकडून संप जाहीर करण्यात आल्यामुळे देशातील सर्व बँक मंगळवारी बंद राहण्याची शक्यता आहे. फोरमचा सार्वजनिक बँकांचे खासगीकरण आणि बँकांचे विलीनीकरण व एकत्रिकरणाला विरोध आहे. देशभरातील बँकांच्या १ लाख ३२ हजार शाखांमधील एकूण १० लाख बँक कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
पैशांच्या देवाण घेवाण व्यवहारावर बँक कर्मचा-यांच्या या संपामुळे परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पण, मोबाईल बॅंकींग आणि एटीएम सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. तुम्हालाही बँकेच्या संबंधित काही काम करायचे असेल तर ते आजच पूर्ण करा नाहीतर संपाचा फटका तुम्हालाही बसू शकतो.