लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन


मुंबई – नवसाला पावणारा अशी ख्याती प्राप्त असलेल्या लालबागच्या राजाचे आज मुखदर्शन खास प्रसार माध्यमांसाठी ठेवण्यात आले होते. यावर्षी मंडळाचे ८४वे वर्ष असल्याची माहिती मंडळाचे मानद् सचिव सुधीर साळवी यांनी दिली. दरम्यान येत्या शुक्रवारपासून येथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील लाखोच्या संख्यने भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येथे येतील. तसेच यंदा मंडळातर्फे भक्तांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. यावर्षी मंडळातर्फे ५१ कोटींचा विमा उतरवण्यात आल्याची माहिती देखील सुधीर साळवी यांनी दिली.

(छायाचित्रे – सचिन हळदे)
लालबागच्या राजाची विधिवत पूजा करून २५ ऑगस्टच्या पहाटे ४ वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. मूर्तीची पूजा झाल्यावर सकाळी ६ नंतर गणेशभक्तांना राजाचे दर्शन घेता येणार आहे. दरवर्षी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ वेगळे काहीतरी करत असते. गतवर्षी २०१६ च्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या प्रभावळीवर घुबड तयार करण्यात आले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे. त्यामुळे घुबड हे अशुभ नसून शुभ आहे हा संदेश गतवर्षी मंडळाने दिला होता. यंदा २०१७ च्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या प्रभावळीवर कासव कोरण्यात आले आहे. कासवाची प्रभावळ असल्यामुळे यंदा विष्णू अवतार आहे. कासव हे विष्णूच्या १० अवतारापैकी एक आहे. यंदाचा लालबागचा राजा हा विष्णू रुपात आहे. मूर्ती वगळता सर्व विष्णू रुपाला साजेसा साज आहे.

Leave a Comment